डिचोली :
“शब्दांची साधना जेव्हा तपश्चर्या बनते, तेव्हा विश्वविक्रमही तिच्यासमोर नतमस्तक होतो.”
ही ओळ नुकत्याच डिचोली (गोवा) येथे २७ जून ते २८ जून या कालावधीत, सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० अशा सलग चोवीस तास गझल आणि कविता वाचनाचा विश्वविक्रम करणाऱ्या दत्तप्रसाद जोग यांच्या कर्तृत्वाला अगदी समर्पक ठरते. त्यांच्या या अद्वितीय साहित्यसाधनेबद्दल आज सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फुलांना आपल्या सुगंधाची, सूर्याला आपल्या तेजाची आणि जन्मदात्या आईला आपल्या प्रेमाची व मायेची जाहिरात करावी लागत नाही. काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचे कार्यच त्यांची खरी ओळख बनते. दत्तप्रसाद जोग हे असेच एक व्यक्तिमत्त्व. स्वतःच्या प्रतिभेच्या, अथक परिश्रमांच्या आणि साहित्यनिष्ठेच्या बळावर त्यांनी मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान निर्माण केले आहे. या विश्वविक्रमाने त्यांच्या कर्तृत्वावर मानाचा कळस चढविला आहे.
दत्तप्रसाद जोग यांचा जन्म एका सुसंस्कृत, मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील दत्तात्रय हे बागायतदार होते. पौरोहित्य, ज्योतिष आणि कीर्तन यांची त्यांना विशेष आवड होती. त्यामुळे त्यांच्या घरी सतत येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असे. आई नंदिनी या गृहकृत्यदक्ष, प्रेमळ आणि सर्वांना आनंद देणाऱ्या होत्या. आई-वडिलांकडून लाभलेले संस्कार दत्तप्रसाद आणि त्यांच्या भावंडांच्या व्यक्तिमत्त्वात सहज उतरले. त्या घरात आर्थिक संपन्नतेपेक्षा संस्कारांची आणि माणुसकीची श्रीमंती अधिक होती.दत्तप्रसाद यांची इच्छा वकील होण्याची होती; मात्र घरच्या शेतीमुळे त्यांनी कृषी पदवी संपादन केली. साहित्याची ओढ मात्र कायम राहिली. कविता, वाचन आणि लेखन यांची आवड दिवसेंदिवस वाढत गेली. जुन्या काव्यसंग्रहांचे वाचन करताना शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव अधिकाधिक होत गेली. साहित्यावरील प्रेमामुळे त्यांनी मराठी विषयात एम.ए. पूर्ण केले आणि लेखणीला नवे बळ मिळाले.
वडिलांच्या प्रोत्साहनामुळे छंद, वृत्त, लय, मात्रा आणि संगीत यांविषयी त्यांना लहानपणापासूनच विशेष गोडी निर्माण झाली. ग. दि. माडगूळकर यांचे गीतरामायण आणि त्याला स्वरसाज देणारे सुधीर फडके यांचे अमर संगीत त्यांच्या मनात खोलवर रुजले. त्यातूनच कविता, वृत्तबद्ध रचना आणि गझल यांकडे त्यांचा ओढा वाढत गेला.
महाविद्यालयीन जीवनात श्रीकृष्ण राऊत आणि अशोक बागवे यांच्या रचना त्यांना विशेष भावत. ज्येष्ठ गझलकार माधवराव सटवाणी आणि स्वर्गीय मधुसूदन नानिवडेकर यांनी त्यांची गझलेशी घट्ट मैत्री करून दिली. त्यानंतर टिटवाळ्याचे प्रशांत वैद्य यांनी गझललेखनाचे सखोल मार्गदर्शन केले. नितीन देशमुख, अश्विनी आपटे, जनार्दन म्हात्रे आणि अनिल आठलेकर यांसारख्या सहृदय मित्रांचे प्रोत्साहन त्यांना सातत्याने लाभत राहिले.आज दत्तप्रसाद जोग गोवा कृषी खात्यात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. निसर्गाशी त्यांची नाळ लहानपणापासूनच जोडलेली आहे. तबलावादन, बुद्धिबळ, रहस्यकथा वाचन, तसेच बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करण्याचा त्यांना विलक्षण छंद आहे. एखादे काम हातात घेतले की ते उत्कृष्टच झाले पाहिजे, हा त्यांचा स्वभाव. हाच ध्यास त्यांच्या साहित्यसाधनेतही दिसून येतो आणि त्यामुळेच त्यांनी गझलविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. मंजिरी यांची त्यांना मोलाची साथ लाभली आहे. त्या उच्चशिक्षित असून शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गोवा राज्याचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गायन हा त्यांचा आवडता छंद. दोघांचाही कामाचा व्याप मोठा असला, तरी आपल्या मुलाकडे त्यांनी प्रेमाने आणि जबाबदारीने लक्ष दिले आहे. संसार, नोकरी आणि समाजकार्य यांचा सुंदर समतोल त्यांनी साधला आहे.
समाजाप्रती असलेली बांधिलकीही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एस.एस.व्ही. ट्रस्ट संचलित शांतिकुटीर वृद्धाश्रमाच्या कार्यात दोघेही सक्रिय सहभाग घेतात. गरजू लोकांना मदतीचा हात देणे, तसेच गझल शिकण्याची इच्छा असलेल्या नवोदितांना कोणत्याही अपेक्षेशिवाय, विनामूल्य आणि न थकता मार्गदर्शन करणे, हा त्यांच्या स्वभावधर्माचा भाग बनला आहे. ज्ञान स्वतःपुरते न ठेवता ते इतरांपर्यंत पोहोचविणे, हीच खऱ्या अर्थाने साहित्यसेवा होय.
दत्तप्रसाद जोग यांच्या साहित्यसेवेचा गौरव अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात आला आहे. यशवंत पुरस्कार (गोवा), गदिमा पुरस्कार, सुरेश भट पुरस्कार, अनिल साठे पुरस्कार, बा. भ. बोरकर स्मृती पुरस्कार अशा अनेक मानाच्या सन्मानांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. मात्र या सर्व पुरस्कारांवर मानाचा कळस चढविला तो डिचोली येथे सलग चोवीस तास गझल आणि कविता वाचन करून केलेल्या विश्वविक्रमाने.सलग चोवीस तास रसिकांना शब्दांच्या विश्वात रमविणे ही केवळ शारीरिक किंवा मानसिक क्षमता नव्हे; ती साहित्यावरील निस्सीम श्रद्धा, सातत्यपूर्ण साधना आणि अढळ जिद्दीचे प्रतीक आहे. असा विक्रम सहज घडत नाही. त्यामागे वर्षानुवर्षांची तयारी, अभ्यास, आत्मविश्वास आणि शब्दांशी असलेले एकनिष्ठ नाते दडलेले असते.विश्वविक्रम मोडले जातात; नवीन विक्रमही घडत राहतात. पण साहित्याची निस्सीम सेवा, शब्दांवरील अढळ श्रद्धा, नवोदितांना दिलेले निःस्वार्थ मार्गदर्शन आणि माणुसकी जपणारी वृत्ती हीच एखाद्या साहित्यिकाची खरी ओळख ठरते. दत्तप्रसाद जोग यांनी आपल्या कृतीतून हा आदर्श घालून दिला आहे.
“शब्दांची साधना जेव्हा तपश्चर्या बनते, तेव्हा विश्वविक्रमही तिच्यासमोर नतमस्तक होतो.” या वाक्याचा प्रत्यय त्यांच्या जीवनाकडे पाहताना पुन्हा एकदा येतो.विश्वविक्रमी साहित्यसाधक, कलंदर कवी आणि संवेदनशील माणूस म्हणून दत्तप्रसाद जोग यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या लेखणीतून, वाणीतून आणि कार्यातून मराठी भाषा, गझल आणि साहित्यसेवेचा हा अखंड प्रवास असाच अविरत सुरू राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
विश्वविक्रमा साठी मनापासून पुन्हा पुन्हा अभिनंदन
प्रतिभा पिटके
अमरावती
9421828413
