*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्मृतींचे धागे*
(लवंगलता ८+८+८+४)
नदीकिनारी घुमतो वारा, गंध फुलांचा येई
सांजसावल्या अलगद येता, रंग नभाचे घेई
सांज उतरता काठावरती नभही गहिरे होई
नजरेमधले मूक इशारे गाली लज्जा येई
नकळत माझ्या काळजातुनी,भाव नव्याने येई
हळव्या हळव्या आठवणींनी, जीव गुंतुनी जाई
लाटांवरती चंद्रप्रभाही रेशम जाळे विणती
शांत क्षणी त्या लहरींचेही सूर मनाशी जुळती
नजरेतुनिया बोल उमटले, शब्द न ओठी आले
हव्याहव्याशा सहवासाचे, मनात धागे रुजले
मुग्ध क्षणांचा जलतरंग तो, गूज मनाला सांगे
सहवासाच्या मधुर स्मृतींचे, जपले हृदयी धागे
©️®️, डॉ मानसी पाटील
