You are currently viewing विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत प्रशासकीय तयारी वेगाने सुरू असून, एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये आणि अपात्र मतदारांची नावे यादीत राहू नयेत, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा आणि शेतीचा हंगाम सुरू असल्याने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. त्याबाबत प्रशासनाकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत मयत स्थलांतरित, दुबार मतदारांची नावे वगळण्यावरही लक्ष दिले जाणार आहे. मतदारांचे मॅपिंग बऱ्यापैकी पूर्ण झाल्यामुळे हे काम सुलभ होणार असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कामात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत १२०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. ज्या मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या १२०० पेक्षा जास्त आहे, अशा केंद्रांचा सुसूत्रीकरण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण ९२१ मतदान केंद्र असून सर्व बी.एल.ओ. (BLO) चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सन २००२ नंतर प्रथमच अशा प्रकारचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. त्यानुसार आगामी २९जून २०२६ नंतर बी.एल.ओ. घरोघरी जाऊन ‘Enumeration Form’ (गणना फॉर्म) चे वाटप व संकलन करणार आहेत. या प्रक्रियेनंतर दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘प्रारूप मतदार यादी’ प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नागरिकांना आपल्या दावे व हरकती नोंदवता येतील, ज्यावर रीतसर सुनावणी घेतली जाईल. दावे व हरकतींचे काम वेगाने व्हावे यासाठी अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व दावे आणि हरकतींचा निपटारा केल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ मध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांच्यासह सुधाकर माणगावकर पी. के. चौकेकर, समर्थ राणे, दत्तगुरु बि. चोडणकर, दिपेंद्र र. चव्हाण आदी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा