*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम लेख*
*“तो आणि ती”*
हिरव्यागार नाजुकशा इवल्या इवल्या पानातून हळूच डोकं वर काढून केशरी नारिंगी लालचुटुक रंगाची मनमुक्त मनसोक्त उधळण करणारा गुलमोहर..
भर उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर तेजाशी स्पर्धा करताना तशाच तीक्ष्ण तांबड्या रंगानं त्याच्याशी यशस्वी लढत देणाऱ्या अशा या गुलमोहरने ..
माझ्या मनात खास स्थान मिळवले आहे.
माहेरचं घर शेतात असल्यासारखं ! गेटपाशीच भला मोठा गुलमोहर जणू घराची राखण करीत असल्यासारखा वाटे !
जाडजूड बुंधा आणि ऐसपैस पसरलेला त्याच्या फांद्यांचा विस्तार ! त्यामुळे लांबूनच त्याचं दर्शन घडायचं.
सासरहून माहेरी येताना गुलमोहोर दिसला की वाटायचं..
वात्सल्यानं आपले बाहू पसरून..
“ये ग..ये ग ..माहेरवाशीण
घालवतो तुझा अवघा शीण”
..असं म्हणून मनाला दिलासा देतोय !.
असंच वाटायचं.
घरात जाऊन माहेरच्या माणसांना भेटण्याच्या आनंदाला अशी गेटपासूनच सुरुवात व्हायची !
गेटला लागून झाडाखाली कट्टा होता. थकून भागून आल्यावर कट्ट्यावर ज ऽ रा टेकलं तरी त्याच्या थंडगार सावलीत सारा थकवा हलका व्हायचा. मन पुन्हा ताजं तरतरीत व्हायचं.
संध्याकाळी बागेत फिरताना गुलमोहोराच्या झाडाकडे एकटक पहाताना, त्याच्याशी हितगुज करताना
त्याचं अंतरंग स्वच्छ दिसायचं.
“सोसावा लागणारा उन्हाचा सारा ताप आतल्या आत पचवत” हसत हसत आनंदानं जीवनाला सामोरं जाणारा गुलमोहोर..
.. ठामपणे जगावं कसं ?याचा आदर्शच जणू काही आपल्यासमोर ठेवत आहे.. असंच वाटायचं.
त्या गुलमोहराला लगटून एक बोगनवेल वर चढत चढत त्याच्या अंगाखांद्यावर किती छानपणे..
निवांत मनाने निश्चिंतपणे विसावली होती !
पूर्वजन्मीचं प्रेमळ जोडपंच असावं जणू !
एकमेकांप्रती अपार निष्ठा बाळगणारं !
एकमेकांसाठीच जगणारं आणि एकमेकांसाठीच फुलणारं !
..अगदी“एक दूजेके लिये”असंच !
खंबीरपणे उभा असलेला गुलमोहोर आणि त्याच्या विश्वासावर त्याला अगदी बिलगून पण स्वत:च्या तंद्रीत, स्वत:च्या धुंदीत कोणत्याही ताणाविना इकडे तिकडे “मनसोक्त झुलत राहणारी” पांढऱ्या शुभ्र रंगाची ती गो ऽ ऽ ड बोगनवेल !
जणू स्वतंत्र मतानं, आपापल्या विचारानं जगणारे पण परस्परांशी घट्ट नातं असलेले ते दोन जीव !
ती दोन मनेच !..
“तो गुलमोहोर आणि ती बोगनवेल” !
किती मनोरम दृश्य होतं ते !
जगात याहून सुंदर दुसरं काहीच नसेल असं वाटायला लावणारं !
अंत:करणात जपलं जाणारं !
मनात तरळतच राहणारं !!
डॅा.शरयू शहा, मुंबई.
9619023330
