You are currently viewing दिवस आजचा हाती…
Oplus_16908288

दिवस आजचा हाती…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दिवस आजचा हाती…*

 

दु:ख दु:ख विसर तूच मंत्र सुखाचा जपूनी

झाड आनंदाचे बनूनी जावे काही करूनी..

 

बुडबुडा असलो तरीही दिवस आज असतो हाती

नश्वर जरी हा देह आपुला का करावी माती..

 

प्राण जोवरी असती शरीरी संकल्प असावा मनी

संकल्पास्तव व्हावे लागते अपयशाचे धनी..

 

सातत्य असावे सदा जीवनी यश ही मग आकळते

आणि अचानक एक दिवस मग नशिब ही फळफळते..

 

देण्याचे घ्यावे सदा व्रत हो कमी न पडते कधी

दुथडी भरून वाहू लागते दानाची ती नदी..

 

नदी न आटते देत राहते वाळूतूनही नीर

वाफ होऊनी जलधी देतो तोय पहा भरपूर..

 

तारे वारे नक्षत्रे वृक्ष अनल अनिलही देती

विश्वातील हे घटक सारे अनमोल असती मोती..

 

व्रत घ्यावे धरतीचे आपण नित्य हरित असावे

इंद्रधनुसम रंग जीवनी भरून आपण जगावे..

 

आनंदाचा कंदच आपण इतरां सुखी करावे

कंटक आले जरी जीवनी हसवावे नि हसावे..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा