‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’चा संदेश; अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे योगाचे महत्त्व अधोरेखित
सिंधुदुर्गनगरी :
बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा आयुष विभाग, मेरा युवा भारत, एन.सी.सी. आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात विशेष योग कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांनी योग हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा प्रभावी मार्ग असून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधण्यासाठी योग आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सौ. सुप्रिया वालावलकर, अधिष्ठाता डॉ. संतोष कुपरे, श्री. तनुज मंडलिक, लेफ्टनंट कर्नल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तालुका क्रीडा अधिकारी सौ. प्रविण वानखेडे, महाव्यवस्थापक (उद्योग) श्री. श्रीपाद दामले, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कृपा गावडे, ‘माय भारत’ राज्य क्रीडा मार्गदर्शक सौ. माधुरी गराळ तसेच जिल्हा समन्वयक अपेक्षा मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आणि एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता तणाव, चिंता आणि विविध आजारांवर योग हा प्रभावी उपाय असल्याचे सांगताना सौ. शुभांगी साठे यांनी नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक व सुदृढ बनते, रक्ताभिसरण सुधारते तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, असे सांगितले. योगामुळे मनःशांती मिळून एकाग्रता वाढते आणि शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सक्षम होते, असेही त्यांनी नमूद केले.
यावर्षीच्या योग दिनाचे ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हे घोषवाक्य आहे. केंद्र शासनाच्या Common Yoga Protocol नुसार आयुष विभागाच्या योग शिक्षिका श्रीमती साधना गुरव आणि श्री. रवींद्र पावसकर (पतंजली) यांनी प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात केली. यावेळी योगपूर्व व्यायाम, विविध योगासने, प्राणायाम, नाडी शोधन क्रिया, भ्रामरी तसेच ध्यानसाधना घेण्यात आली. उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगासने केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कृपा गावडे, जिल्हा आयुष अधिकारी यांनी केले, तर तुषार परब, माय भारत यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
