You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल मंडळात सामाजिक उपक्रमांचा आणि विकासकामांचा जल्लोष

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल मंडळात सामाजिक उपक्रमांचा आणि विकासकामांचा जल्लोष

३३ अंगणवाड्यांतील १७० बालकांना साहित्य वाटप, सेविकांना छत्री वितरण, मोफत आधार-फार्मर आयडी कॅम्प आणि विकासकामांचे भूमिपूजन-लोकार्पण

पडेल :

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जून २०२६ रोजी पडेल मंडळात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाभिमुख उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजोपयोगी कार्यांद्वारे आणि लोकहिताच्या कार्यक्रमांद्वारे साजरा करण्याच्या उद्देशाने पडेल मंडळ भाजप व स्थानिक कार्यकर्त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

या निमित्ताने पडेल मंडळातील पोंभुर्ले, पुरळ, पडेल आणि बापार्डे जिल्हा परिषद गटांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण आहे.

पोंभुर्ले जिल्हा परिषद गटात अंगणवाडी बालकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या गटातील ३३ अंगणवाडी केंद्रांमधील सुमारे १७० बालकांना शालेय उपयोगी साहित्य आणि खेळण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. बालकांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना छत्रींचे वितरण करण्यात येणार आहे.

पुरळ जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोफत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिर तसेच फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.

याशिवाय पडेल आणि बापार्डे जिल्हा परिषद गटांमध्ये मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच पूर्णत्वास गेलेल्या कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या भागात मंजूर झालेल्या विकासकामांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळाली असून या कार्यक्रमांद्वारे अनेक महत्त्वाच्या कामांची अधिकृत सुरुवात होणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस समाजहिताचे उपक्रम, जनसेवा आणि विकासकामांच्या माध्यमातून साजरा करण्याचा मानस लक्षात घेऊन पडेल मंडळाने विविध लोककल्याणकारी कार्यक्रमांचे नियोजन केले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थी, महिला, अंगणवाडी सेविका, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे.

२३ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमांना पडेल मंडळातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पडेल मंडळ भाजप व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा