You are currently viewing भेगाळली तप्त भुई

भेगाळली तप्त भुई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*भेगाळली तप्त भुई*

ऊन काहिली काहिली
जणू अग्नीच्याच ज्वाळा
कोपलेला सूर्यदेव
असा प्रखर उन्हाळा…

भेगाळून गेली भुई
चरा मौठाल्या पडल्या
कधी बरसेल धारा
संपू दे रे उष्ण झळा…

माना टाकल्या वृक्षांनी
चोच मिटेना‌ पाखरे
कासावीस प्राण झाले
तहानली गुरेढोरे….

झाडांनाही वाटे आता
याव्या पर्णिका कोवळ्या
फांदी फांदी मोहरावी
याव्या कलिका सगळ्या.‌..

ओढे ओहळ आटले
थेंब गवसेना कोठे
दिसे भग्न ती पहाडी
ढग यावे आता मोठे…

काळे सावळे आभाळ
आता प्रतिक्षा तयाची
वीज चमकून जावी
सर टपो-या मोत्यांची…

घर अंगण भिजू दे
शेतमाती लोण्यावाणी
बळीराजा तो प्रसन्न
उत्साहात गातो गाणी…

ऊन सावलीचा खेळ
ऋतू बदलतो रूप
पोटी बियाणं रूजवी
सृजनाचे हे अप्रूप..!!

अरुणा दुद्दलवार✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा