*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सरली कालची रात्र आता*
सरली कालची रात्र
आता जाग रे मोहना
क्षितिजावर पूर्वेला
येतो आहे आदित्य राणा….
तारका नभातून
जातात परतून
चंद्रकोर फिकुटली
गेली मिटून मिटून….
सोन किरणांचे आता
अंगणात रे शिंपण
गाती पक्षी आवडीने
आळविती गोड धून….
हंबर वासरांचा
निघे चरावया धेनू
विश्व अवघे हासले
चैतन्याने खुले जणू….
गोपी निघाल्या पाण्याला
कळशी ती कटेवरी
पायी वाजती पैंजण
नाद तालासुरावरी….
उठ उठ रे मुकुंदा
काढ पापण्यांची दारे
कमलासम लोचने
नीलरंगात हसरे…
पहाटेच्या प्रहराला
गाते तुजला भूपाळी
वाट पाहे वेलीवर
उमलण्या कळी कळी…
टाक इवली पावले
घुमू दे पाव्याचे स्वर
गोकुळाचे तू चैतन्य
उठ कान्हा रे सत्वर…..!!
🍃🌳🌿🌺🍃🍁🍂🪻✨ अरुणा दुद्दलवार @✍️