सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक; राज्यभर ४ हजारांहून अधिक वितरण केंद्रे कार्यरत, गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
मुंबई :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी प्रवासात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे, या उद्देशाने स्मार्ट कार्ड प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला असून, आजअखेर सुमारे ५१ लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने संबंधितांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.
दरम्यान, स्मार्ट कार्ड वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी १ ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
