You are currently viewing एसटी प्रवाशांना आणखी एक महिना झळ; १० टक्के हंगामी भाडेवाढ १५ जुलैपर्यंत कायम

एसटी प्रवाशांना आणखी एक महिना झळ; १० टक्के हंगामी भाडेवाढ १५ जुलैपर्यंत कायम

उन्हाळी गर्दी संपल्यानंतरही दरवाढीला मुदतवाढ; प्रत्येक तिकीटावर २ रुपयांचा स्वच्छता अधिभारही कायम राहणार

कणकवली :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना उन्हाळ्यात सुट्टी कालावधीत लागू केलेल्या हंगामी भाडेवाढीचा धक्का पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी परिवर्तनशील भाडेवाढ लागू केली असून ती १५ एप्रिल ते १५ जूनसाठी लागू केली होती. ही भाडेवाढ आता १५ जुलैपर्यंत पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबत प्रत्येक तिकीटावर दोन रुपये स्वच्छता अधिभारही कायमस्वरुपी असणार आहे.

उन्हाळी हंगामासाठी लागू करण्यात आलेली परिवर्तनशील भाडेवाढ ही साधी, जलद व रात्रसेवा या बससाठी होती. ही दहा टक्के भाडेवाढ करताना महामंडळाने २००६ मधील सुधारणेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्या, सप्ताह,गर्दी हंगाम, आदी कालावधीसाठी ३० टक्केपर्यंत भाडेवाढ करण्यास मान्यता दिली होती. या अंतर्गत दहा टक्के भाडेवाढ या उन्हाळी हंगामासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात साधा बससेवेचा प्रकार वगळता निमआराम, वातानुकूलित शयनआसनी, वातानुकूलित शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी, ई-बस या बससेवा प्रकारात उन्हाळी गर्दी हंगाम कालावधीत कोणतीही वाढ केलेली नव्हती. १६ जूनपर्यंत ही भाडेवाढ लागू असणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता नव्याने काढण्यात आलेल्या पत्रानुसार आता १५ जुलैपर्यंत ही भाडेवाढ लागू राहणार असल्याचे म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर या हंगामी दरवाढीला मुदतवाढ देण्यात आली असून भविष्यात ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा