विनापरवाना खत, बियाणे व किटकनाशक विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल;
कृषी विभागाची वेंगुर्ल्यात धडक कारवाई
सिंधुदुर्गनगरी
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आणि दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथे विनापरवाना खत, बियाणे व किटकनाशके विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आडेली येथील कृष्णप्रभा अग्रोटेक या कृषी निविष्ठा विक्री केंद्रात खत, बियाणे व किटकनाशकांचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या पथकाने दुकानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान दुकानातील कर्मचाऱ्यांकडे आवश्यक परवान्याची मागणी करण्यात आली असता खत, बियाणे व किटकनाशके विक्रीसाठी आवश्यक असलेले अधिकृत परवाने उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
चौकशीत हे दुकान संजय कृष्णा मडव आणि समीक्षा धुरी यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले. परवाना नसताना खत, बियाणे व किटकनाशकांचा साठा व विक्री केल्याने संबंधितांनी खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, किटकनाशक अधिनियम १९६८ आणि बियाणे अधिनियम १९६६ यांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान दुकानातून २३३ किलो खत रक्कम रुपये १ लाख ७६ हजार ६४०, ३१६ लिटर किटकनाशके रक्कम रुपये २ लाख ३५ हजार ६३९ आणि ७४ किलो बियाणे रक्कम रुपये ११ हजार ७६५ असा एकूण ४ लाख २४ हजार ०४४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच पंचासमक्ष दुकान सीलबंद करण्यात आले.
कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) वेंगुर्ला प्रकाश मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेंगुर्ला पोलीस ठाण्यात संजय कृष्णा मडव व समीक्षा धुरी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात कोणीही अनधिकृत, विनापरवाना अथवा चढ्या दराने खते, बियाणे व किटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार करावी.
ही कारवाई कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, कारवाईत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले, कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गवस, तसेच पोलीस पाटील सहभागी झाले होते. या कारवाईमुळे जिल्ह्यातील विनापरवाना कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
