वेंगुर्ला
तालुक्यातील रेडी खाडीत तरवाडी, पिळणकर वाडी, सौदागर वाडी येथे गेले अनेक महिने रात्रीचे अवैध वारेमाप वाळू उत्खनन व वाहतूक सुरू होती. यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन काल महसूल विभागाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. मात्र याबाबत त्यांना सुगावा लागल्याने तेथे वाळू काढायच्या होड्या किंवा कामगार सापडले नाहीत. परंतु तेथे कामगारांसाठी बांधलेली झोपडी, वाळू काढण्यासाठी तयार केलेले तुटलेले रॅम्प दिसून आले. त्याची पंचयादी बनविल्याने वाळू काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
संस्थेच्या वतीने रेडी खाडीत मागील एक वर्षापासून स्थानिक वाळू तसकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करीत असल्याने त्यांचेवर कारवाई व्हावी या पत्रव्यवहारास अनुसरून रेडी खाडीत होणारे अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक बाबत तसेच अनधिकृत राहणाऱ्या भैयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश महसूल अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, पोलीस व तलाठी यांना वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे यांनी दिले. त्या अनुषंगाने काल ही कारवाई करण्यात आली.
महसूल विभागाच्या पथकामध्ये शिरोडा येथील मंडळ अधिकारी भानुदास चव्हाण, शिरोडा तलाठी फिरोज खान, रेडी तलाठी सोळंखी, रेडी कोतवाल श्री कनयाळकर, गांधीनगर कोतवाल श्री परब, रेडी पोलीस श्री नाईक आदींचा समावेश होता. दरम्यान यापुढे रेडी खाडीत अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रविण लोकरे यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक वाळू तसकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या संयुक्त कारवाईमुळे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार वेंगुर्ला प्रविण लोकरे यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले असल्याचे संस्थेचे सीईओ राजन रेडकर यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय संपत्तीची होणारी वाळूची चोरी, पर्यावरणाचा -हास व महसुलाचे नुकसान रोकण्यासाठी वाळू तस्करी करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करून चाप बसवावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.