आंबोलीच्या पर्यटन विकासासाठी सरपंच सावित्री पालयेकर यांचे कार्य कौतुकास्पद : अतुल बंगे
सदिच्छा भेटीत पर्यटन सुविधा, विकासकामे आणि ग्रामपंचायतीच्या उपक्रमांचा घेतला आढावा
आंबोली | प्रतिनिधी :
देशातील अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या आंबोली गावात पर्यटन सुविधांच्या विकासासाठी सरपंच सौ. सावित्री पालयेकर यांच्यासह ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील असून त्यांचे कार्य जिल्ह्यासाठी भूषणावह असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी काढले.
आंबोली ग्रामपंचायतीला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी पर्यटन गाव विकसित करण्यासाठी शासनाकडे कशा प्रकारे पाठपुरावा केला जातो, याची माहिती सरपंच सौ. सावित्री पालयेकर आणि श्री. वामन पालयेकर यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी श्री. बंगे यांनी पालयेकर दाम्पत्यांचा श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
यावेळी बोलताना श्री. बंगे म्हणाले की, आंबोलीला देशाच्या पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, एका महिला सरपंचाच्या नेतृत्वाखाली विकासकामे धडाडीने पुढे नेली जात असल्याचे पाहून समाधान वाटते. पर्यटनवृद्धीसाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर ग्रामपंचायतीने विशेष भर दिला आहे.
केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाकडून विविध योजनांमधून निधी प्राप्त करून त्याचा योग्य विनियोग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आंबोलीचा पर्यटनदृष्ट्या अधिक विकास व्हावा, हेच ग्रामपंचायतीचे प्रमुख ध्येय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आंबोली ग्रामस्थांची विकासासाठीची एकजूट आणि पर्यटकांना दिले जाणारे सहकार्य हे विशेष कौतुकास्पद असल्याचेही श्री. बंगे यांनी नमूद केले. तसेच श्री. वामन पालयेकर आणि सरपंच सौ. सावित्री पालयेकर विकासकामांसाठी पूर्ण क्षमतेने झटत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली असली तरी प्रशासकीय स्वरूपात सरपंच, उपसरपंच आणि सदस्य गावाचा कारभार सांभाळत असून सर्वांना सोबत घेऊन विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. गावातील मूलभूत सुविधा आणि पर्यटनविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आंबोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. गोसावी यांचेही श्री. बंगे यांनी कौतुक केले. पारदर्शक कारभार, अभ्यासू वृत्ती आणि ग्रामपंचायतीला योग्य मार्गदर्शन यामुळे विकासकामांना गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
