आचऱ्यात मोकाट गुरांचा वाढता उपद्रव; कारवाईची माहिती देण्याची मागणी
रुपेश टेमकर यांचे ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढल्याची चिंता
मालवण
आचरा गावातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मोकाट गुरांबाबत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी रुपेश मंगेश टेमकर यांनी ग्रामविकास अधिकारी माधुरी कामतेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी गणेश पाटकर, दर्पण आचरेकर, गौरव पेडणेकर आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आचरा गावातील मुख्य रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट गुरांचा वावर वाढला असून त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. अनेकदा वाहनचालकांना या गुरांमुळे छोटेमोठे अपघातही सहन करावे लागत आहेत. भविष्यात गंभीर अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यापूर्वीही या विषयासंदर्भात आचरा ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामसभेत मोकाट गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही मोकाट गुरांचा प्रश्न कायम असून त्यांचा त्रास कमी झालेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच, यापूर्वी सादर केलेल्या अर्जावर ग्रामपंचायतीने नेमकी कोणती कार्यवाही केली याची लेखी माहिती द्यावी आणि भविष्यात मोकाट गुरांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर राहणार याबाबतही स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी टेमकर यांनी केली आहे.
