राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत निरवडेच्या योगेश पारकरची बाजी…
सावंतवाडी
महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे नवी मुंबई येथे ४ जून ते ६ जून या कालावधीत २० वी महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच कॅडेटन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या अत्यंत मानाच्या आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील सुपुत्र योगेश पारकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत आपल्या अचूक निशाण्याने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा संपूर्ण महाराष्ट्रातील मातब्बर आणि नामांकित नेमबाज सहभागी झाले होते. या तगड्या स्पर्धेत निरवडे येथील योगेश पारकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. त्यांनी या स्पर्धेत ईझेड-२९ ५० मीटर ओपन साईट स्टॅंडर्ड रायफल प्रॉन मेन या कठीण प्रकारात सहभाग घेतला होता. यात त्यांनी अत्यंत दमदार कामगिरी करत ६०० गुणांपैकी ४१८ गुणांची नेत्रदीपक कमाई केली आणि दोन ब्राँझ पदके पटकावून स्पर्धेत आपला वेगळा ठसा उमटवला. योगेश पारकर यांना रत्नागिरी येथील प्रशिक्षक मा. श्री. पुष्कराज इंगवले व राजश्री इंगवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातून पुढे येत त्यांनी राज्यपातळीवर मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.
योगेश पारकर यांच्या या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार विक्रम भांगले सर, प्रशिक्षक कांचन उपरकर सर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, निरवडे ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या या यशामुळे निरवडे गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
