You are currently viewing महाराष्ट्र चेंबर निवडणुकीत ‘प्रगती पॅनल’ची दमदार एंट्री

महाराष्ट्र चेंबर निवडणुकीत ‘प्रगती पॅनल’ची दमदार एंट्री

महाराष्ट्र चेंबर निवडणुकीत ‘प्रगती पॅनल’ची दमदार एंट्री

‘विकास कोकणचा, निर्धार प्रगती पॅनलचा’; उद्योग, व्यापार व कृषी विकासासाठी आठ कलमी जाहीरनामा

मालवण

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरच्या सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, कोकण विभागाच्या सर्वांगीण औद्योगिक, व्यापारी व कृषी विकासाला गती देण्याच्या उद्देशाने ‘प्रगती पॅनल’ पूर्ण ताकदीने निवडणूक मैदानात उतरले आहे. ‘विकास कोकणचा, निर्धार प्रगती पॅनलचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन पॅनलने कोकणातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या प्रगतीसाठी आपला ठोस जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
या निवडणुकीत प्रगती पॅनलचे नेतृत्व ज्येष्ठ उद्योजक कांतिलाल चोपडा करत आहेत. पॅनलतर्फे वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी संगीता पाटील, कोकण विभाग उपाध्यक्षपदासाठी भालचंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गव्हर्निंग कौन्सिलसाठी अन्वेषा आचरेकर, अशोक सारंग, भालचंद्र (अवी) सामंत, गंगाराम (अमेय) पै, राजेंद्र गावकर, रामचंद्र घोगळे आणि उत्तम सराफदार हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
कोकणातील उद्योगविश्वाला नवी दिशा देण्यासाठी प्रगती पॅनलने आठ प्रमुख उद्दिष्टे जाहीर केली आहेत. यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी विशेष मदत, स्थानिक उद्योजकांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, कोकणातील उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळख मिळवून देणे, नवउद्योजक व स्टार्टअप्सना प्रोत्साहन, व्यापार क्षेत्राचे डिजिटलायझेशन, मत्स्य, पर्यटन व कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना, औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी शासनाकडे पाठपुरावा तसेच व्यापारी व उद्योजकांच्या स्थानिक समस्या प्राधान्याने सोडविणे यांचा समावेश आहे.
कोकणातील उद्योग, व्यापार, पर्यटन, कृषी आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी प्रगती पॅनलचे सक्षम नेतृत्व कटिबद्ध असल्याचा विश्वास सर्व उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीचे मतदान ११ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एमआयडीसी असोसिएशन हॉल, पी-४१, एमआयडीसी कुडाळ येथे होणार आहे. उद्योजकांच्या प्रगतीसाठी आणि उद्योगांच्या भरारीसाठी प्रगती पॅनलला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन पॅनलच्या वतीने कोकणातील उद्योजक, व्यापारी व सभासदांना करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा