You are currently viewing सावंतवाडीतील वीज टंचाईवर उद्या विशेष बैठक
Pramod jathar

सावंतवाडीतील वीज टंचाईवर उद्या विशेष बैठक

सावंतवाडीतील वीज टंचाईवर उद्या विशेष बैठक

आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये होणार चर्चा

सावंतवाडी

शहरात मे महिन्यापासून सुरू असलेल्या तीव्र वीज टंचाई आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उद्या, ५ जून रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक दुपारी १२ वाजता काझी शहाबुद्दीन हॉल येथे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
महावितरणचे वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित
या बैठकीला महावितरणच्या कुडाळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. वनमोरे यांच्यासह सावंतवाडी अर्बन विभागातील सर्व अभियंते उपस्थित राहणार आहेत. रखरखत्या उन्हाळ्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी तसेच व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अपेक्षित सुधारणा न झाल्याने आमदारांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नागरिकांनी समस्या थेट मांडाव्यात
शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या भागातील वीज पुरवठ्याशी संबंधित समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सभापती आनंद नेवगी आणि माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा