शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला
गडहिंग्लजच्या २१ वर्षीय प्रणय देवमानेचा दुर्दैवी अंत; मित्रांसह फिरण्यासाठी आला होता
वेंगुर्ले
शिरोडा वेळागर येथील समुद्रात मंगळवारी सायंकाळी आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी बुडालेला युवक प्रणय ज्ञानेश्वर देवमाने (वय २१, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) याचा मृतदेह आज बुधवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान समुद्र किनाऱ्यावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सहा मित्र फिरण्यासाठी आले होते
गडहिंग्लज येथील सहा मित्र मोटारसायकलवरून शिरोडा समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. यामध्ये प्रतीक शंकर बुगडे, दर्शन सुरेश जानवरेकर, शिवम चंद्रशेखर मस्ती, विघ्नेश धोंडीबा दळवी, रितेश दीपक कांबळे आणि प्रणय ज्ञानेश्वर देवमाने यांचा समावेश होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रणय आणि प्रतीक हे दोघे समुद्रात आंघोळ व पोहण्यासाठी उतरले होते.
लाटांच्या ओढीमुळे समुद्रात गेला आत
आंघोळ करताना प्रणय हळूहळू समुद्राच्या आतल्या भागाकडे सरकला. पाण्याच्या खोलीचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने तो अचानक समुद्रात बुडाला. त्याच्यासोबत पाण्यात उतरलेला मित्र मात्र पोहत किनाऱ्यावर परत आल्याने बचावला.
रात्रभर शोधमोहीम; सकाळी मृतदेह सापडला
घटनेची माहिती मिळताच शिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ, जीव रक्षक आणि नातेवाईकांनी रात्रभर शोधमोहीम राबविली. मात्र मंगळवारी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. अखेर बुधवारी सकाळी समुद्र किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळून आला.
पोलिस व ग्रामस्थांची उपस्थिती
मृतदेह बाहेर काढण्याच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव, पोलीस कर्मचारी प्रसाद कदम, दीपा मटकर, वेळागर पोलिस पाटील लक्ष्मण तांडेल, सागरतीर्थ पोलिस पाटील सनी मोरजकर, शिरोडा उपसरपंच चंदन हाडये, जीव रक्षक संजय नार्वेकर तसेच आबा चिपकर, बाबल गावडे, ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते.
शवविच्छेदनासाठी रेडी आरोग्य केंद्रात पाठविले
किनाऱ्यावरून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
पाच मित्र सुखरूप; समुद्रात उतरताना सावधगिरीचे आवाहन
या दुर्घटनेत प्रणय देवमानेचा दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी त्याचे इतर पाच मित्र सुखरूप आहेत. दरम्यान, मान्सूनपूर्व काळात समुद्रातील लाटांचा वेग आणि पाण्याचा प्रवाह अनिश्चित असतो. त्यामुळे समुद्रात उतरताना पर्यटकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
