You are currently viewing मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याच्या आमिषाने निवृत्त नागरिकाची १.९३ लाखांची फसवणूक

मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याच्या आमिषाने निवृत्त नागरिकाची १.९३ लाखांची फसवणूक

मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याच्या आमिषाने निवृत्त नागरिकाची १.९३ लाखांची फसवणूक

दोडामार्गातील धक्कादायक प्रकार; अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

दोडामार्ग

मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्याने येथील एका निवृत्त नागरिकाची तब्बल १ लाख ९३ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
धाटवाडी, दोडामार्ग येथील रहिवासी गुरुदास गोपाळ मणेरीकर (वय ६३) यांना २३ मार्च रोजी दुपारी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. संबंधित व्यक्तीने मोबाईल रिचार्जचे १,४९९ रुपये परत मिळणार असल्याचे सांगून त्यासाठी मोबाईलवर काही प्रक्रिया करण्यास सांगितले.
समोरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मणेरीकर यांनी त्याने दिलेल्या सूचनांनुसार मोबाईलमध्ये आवश्यक माहिती भरली. मात्र, काही वेळातच त्यांच्या एका बँक खात्यातून ९५ हजार रुपये तर दुसऱ्या खात्यातून ९८ हजार ५०० रुपये, अशी एकूण १ लाख ९३ हजार ५०० रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मणेरीकर यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी) आणि ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या फोनवर विश्वास ठेवू नये, तसेच मोबाईल किंवा बँकिंगशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा