सिंधुदुर्गात वन्यजीव तस्करीवर मोठी कारवाई; चौघांना ताब्यात
खवले मांजरांची खवले व सांबराची शिंगे जप्त; ९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सिंधुदुर्गनगरी
खवले मांजरांच्या खवल्यांची आणि सांबराच्या शिंगांची तस्करी केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये १ किलो ८०० ग्रॅम खवले तसेच सांबराच्या दोन शिंगांचा समावेश आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
या प्रकरणी गणेश प्रदीप शिर्के (वय ३०, रा. पडवे, कुडाळ), विठोबा भगवान बावळेकर (वय ८२, रा. रानबांबुळी, कुडाळ), शंकर यशवंत तारापूरे (वय ३१, rा. पडवे, कुडाळ) आणि कालिदास दत्तात्रय वारंग (वय ५५, रा. सुकळवाड, मालवण) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संबंधितांविरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ तसेच बीएनएस अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसोजा, श्री. राणे, श्री. जॅक्सन, श्री. कांडर तसेच पोलिस नाईक समजिस्कर यांनी ही कारवाई पार पाडली.
