डिंगणे नं. १ शाळेत विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप
*बांद* दि. २५ मे :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत दप्तर वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. डिंगणे गावचे सुपुत्र व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले अजित लक्ष्मण सावंत व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने शाळेत शिक्षण घेत असलेल्या २५ विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गावाशी असलेली नाळ जपत विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी यशवंत शिष्यवृत्ती परीक्षेत सुवर्ण पदक प्राप्त करणारे विद्यार्थी पायल जयेश सावंत, रुंजी सुदर्शन सावंत व भावेश सुदन सावंत यांचा नारायण नाईक यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास अजित लक्ष्मण सावंत व त्यांचे कुटुंबीय, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर सावंत, उपाध्यक्ष सोनाली सावंत, सदस्य जयेश सावंत, नारायण नाईक, संजय सावंत, प्रसाद राऊळ तसेच शाळेचे शिक्षक विश्राम ठाकर, रश्मी सावंत, सुजित पवार, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
