You are currently viewing ‘अक्षरांचे अभंग रिंगण’ : अंतर्मनातील पंढरीचा शोध

‘अक्षरांचे अभंग रिंगण’ : अंतर्मनातील पंढरीचा शोध

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गझलकार जयराम धोंगडे यांनी डॉ.नयनचंद्र सरस्वते यांच्या काव्यसंग्रहाचे केलेलं समीक्षण*

 

*‘अक्षरांचे अभंग रिंगण’ : अंतर्मनातील पंढरीचा शोध*

 

आदरणीय माई, डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी मला आठवणीने आणि प्रेमपूर्वक पाठविलेला, त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह ‘अक्षरांचे अभंग रिंगण’ हाती पडताच मी तो अधाश्यासारखा वाचून काढला. तो वाचताना माझ्यातल्या वाचकला जिज्ञासा होतीच पण सोबतच माईंबद्दलचा आत्मीय स्नेहही होता. मात्र या आत्मीयतेच्या धुक्यात केवळ कवितेकडे पाहायचे नाही तर त्या कवितेच्या स्वतःच्या प्रकाशात तिचा अर्थ शोधायचा आहे, ही जाणीवही मनात आहे आणि ती मला तितकीच महत्त्वाची वाटते.

 

या संग्रहाला माझे मार्गदर्शक, ज्येष्ठ बंधू देविदास दादा फुलारी, नांदेड यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यामुळे माई आणि दादांच्या ‘अक्षर रिंगणात’ रमताना, माईंच्या काव्याकडे आणि दादांच्या प्रस्तावनेकडे पाहताना मनात वेगळीच जवळीक निर्माण होते. फुलारी सरांची प्रस्तावना केवळ त्यांच्याविषयीच्या आपुलकीची नोंद राहत नाही, तर ती डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या कवितेच्या भावविश्वात प्रवेश करण्यासाठी माझ्या मनाचे संवेदनशील दार उघडते. त्यांच्या विस्तृत प्रस्तावनेतून माईंच्या कवितांकडे पाहण्याची नेमकी दिशा मिळते. या काव्यसंग्रहातील कविता ह्या केवळ शब्दरचना नाहीत तर त्या अनुभूतीचा, अंतर्मुख शोधाचा आणि भक्तिभावातून उमलणाऱ्या जीवनदृष्टीचा प्रवास आहे, असे मला प्रकर्षाने वाटते.

 

‘अक्षरांचे अभंग रिंगण’ हे लक्ष्यवेधी शीर्षकच संग्रहाचे वैशिष्ट्य आणि त्यातील रचनेचे अंतर्मन सांगून जाते. ‘अक्षर’ म्हणजे शब्द, भाव, अंतर्मनातील स्पंदन; ‘अभंग’ म्हणजे भक्तीची अखंड परंपरा, वारकरी भावविश्व आणि विठ्ठलाशी साधला जाणारा न संपणारा संवाद; तर ‘रिंगण’ म्हणजे त्या अनुभूतीची चालती, बोलती, फिरती, जिवंत अवस्था. त्यामुळे हा संग्रह वाचताना कविता कागदावर थांबत नाही. ती वाचकाच्या मनात हळूहळू आपले पंढरपूर उभे करू लागते.

 

या संग्रहात एकूण १०४ कविता आहेत. शीर्षकांकडे पाहिले तरी कवयित्रीचे भावविश्व किती विस्तृत आहे, हे जाणवते. इथे विठ्ठल आहे, वारी आहे, माया आहे, नाती आहेत, घर आहे, आई आहे, शेतकरी आहे, द्वैत-अद्वैत आहे, तडफड आहे आणि शांततेची खोल ओढही आहे. म्हणून हा संग्रह केवळ भक्तिकवितांचा संग्रह म्हणून वाचणे अपुरे ठरेल. तो भक्तीच्या निमित्ताने जगण्याचा, नात्यांचा, वेदनेचा आणि शब्दसाधनेचा घेतलेला शोध आहे, अशीच माझी ठाम धारणा झाली आहे.

 

माईंच्या कवितेतील विठ्ठल देव्हाऱ्यात बंदिस्त राहत नाही. तो केवळ पूजा करण्याचा देव नाही. तो बोलण्याचा, रुसण्याचा, प्रश्न विचारण्याचा, हट्ट करण्याचा आणि कधी अगदी लाडाने जवळ बोलवावा असा सखा झाला आहे.

 

‘खेळ’ या कवितेत त्या सहज म्हणतात—

 

“चल विठुराया,

आपण दोघे मिळून खेळू…”

 

ही ओळ साधी असली तरी फार बोलकी आहे. भक्तीतील औपचारिकपणा इथे गळून पडतो. देव आणि भक्त यांच्यातील अंतर कमी होते. विठ्ठल त्याच्या गाभाऱ्यातून निघून मनाच्या अंगणात येतो. इथे भक्ती दडपण आणणारी नाही. ती जवळ घेणारी आहे.

 

‘तुझ्याचसाठी’ या कवितेत प्रेम आणि भक्ती यांची नाजूक गुंफण दिसते. कवयित्री लिहितात—

 

“तुझ्या स्पर्शाची गोड भूपाळी

आत्म्यामधली मोहक टाळी”

 

ही केवळ देहाची भाषा नाही आणि केवळ अध्यात्माचीही नाही. या स्पर्शात ओढ आहे, पण ती ओढ आतल्या गाभाऱ्यापर्यंत जाते. नयनचंद्र सरस्वते यांच्या कवितेचे हे वैशिष्ट्य आहे की त्या अध्यात्माला कोरडे होऊ देत नाहीत. त्यात मानवी धडधड, ओलावा आणि जिवंत स्पर्श ठेवतात.

 

‘द्वैत-अद्वैत’ ही कविता संग्रहातील अधिक अंतर्मुख कविता आहे. त्या म्हणतात—

 

“तुझे चित्त माझ्या ठायी

माझे मन तुझ्या पायी…”

 

द्वैत-अद्वैताचा विचार तत्त्वज्ञानात अनेकदा गुंतागुंतीचा होतो. पण माई तो अनुभवाच्या सहजतेतून मांडतात. विठ्ठल माझ्याबाहेर आहे की माझ्यातच आहे, हा प्रश्न त्या तर्काने सोडवत नाहीत. त्या तो भावनेने जगतात. म्हणून या ओळी वाचताना तत्त्वज्ञानही मृदू होते आणि भक्तीही अधिक सखोल होते.

 

या संग्रहात विठ्ठलाशी केलेला संवाद अनेक छटांनी भरलेला आहे. त्यातील ‘ता. क.’ ही कविता विशेष लक्षात राहते. विठ्ठलाला लिहिलेल्या पत्रासारखी ही कविता आहे. देवाशी माणूस कधी नम्रपणे बोलतो, कधी हक्काने बोलतो, कधी तक्रार करतो, कधी अगदी मनातली चीडही व्यक्त करतो. हे पत्ररूप कवयित्रीच्या भक्तीला फार मानवी बनवते. कधी प्रत्यक्ष न पाहिलेल्या देवासोबत आपल्याला इतक्या सहजपणे बोलता येते. त्याच्याकडे तक्रारही करता येते. कारण तो आपला आहे, हा दृढभाव मनात खोल रुजलेला असतो. म्हणून ‘ता. क.’ मधील विठ्ठल हा फक्त दैवत राहत नाही. तो ऐकून घेणारा, कधी उत्तर न देताही जवळ राहणारा जिवलग बनतो.

 

‘वीट’ या कवितेत विठ्ठलाच्या पायाखालच्या विटेकडे कवयित्री वेगळ्या नजरेने पाहतात—

 

“आसक्ती अन् विरक्ती…

विरक्ती अन आसक्ती

झुला झुलत आहे…”

 

खरं सांगू का? मला ही प्रतिमा अत्यंत अर्थवाही वाटते. माणूस आयुष्यभर याच दोन टोकांमध्ये झुलत असतो. एकीकडे संसार, नाती, माया, देह आणि ओढ तर दुसरीकडे विरक्ती, समर्पण, शांती आणि मुक्ती. या दोन्हींपैकी एकाला नाकारून दुसरे स्वीकारण्याचा आग्रह माईंच्या कवितेत नाही. उलट या झुलण्यातूनच जीवनाचा अर्थ उलगडतो. विठ्ठलाची वीट मग फक्त भक्तीपरंपरेतील प्रतीक राहत नाही तर ती जगण्याची मुख्य धारा बनते.

 

‘प्राक्तन’मध्ये जीवनातील अनाकलनीय वेदनेसमोर माई शांतपणे उभ्या राहतात—

 

“काहीच कारण नसते…

अगदी काहीच बरं का”

 

या ओळी खूप साध्या वाटत असल्या तरी मनात खोलवर घुसतात. प्रत्येक दुःखाला स्पष्ट कारण असतेच असे नाही. काही वेदना येतात आणि माणसाला त्यांच्यासोबत जगावे लागते. पण या स्वीकारात पराभव नाही. यात एक परिपक्व शांतता आहे. दुःख समजून घेण्यापेक्षा त्याच्या सहवासात स्वतःला ओळखण्याची वृत्ती आहे.

 

माईंच्या कवितेची भाषा सहज, भावस्पर्शी आणि संवादशील आहे. त्या मोठमोठे तात्त्विक निष्कर्ष मांडत नाहीत. त्या एखादी साधी प्रतिमा देतात आणि वाचकाला आतपर्यंत घेऊन जातात. ओंजळ, तुळस, वीट, स्पर्श, वारी, पत्र, शांतता— या प्रतिमा संग्रहात पुन्हा पुन्हा येतात आणि प्रत्येक वेळी नव्या अर्थाने उजळतात.

 

या संग्रहात वारकरी परंपरेचा सुगंध आहे पण अंधानुकरण नाही. श्रद्धा आहे पण प्रश्न विचारण्याची हिंमतही आहे. समर्पण आहे पण आत्मभान हरवलेले नाही. म्हणून ‘अक्षरांचे अभंग रिंगण’ हा संग्रह भक्तीचा असला तरी तो केवळ देवाकडे नेणारा नाही, तर तो माणसाला स्वतःकडेही परत आणणारा आहे.

 

शेवटी असे म्हणावेसे वाटते की हा काव्यसंग्रह म्हणजे विठ्ठलाच्या पायाशी ठेवलेली शब्दांची ओंजळ आहे— कधी ओलावलेली, कधी थरथरणारी, कधी प्रश्नांनी भरलेली, तर कधी शांत समर्पणाने भरलेली. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या या कवितांमध्ये अक्षरांची साधना आहे, भक्तीची ऊब आहे आणि जगण्याकडे पाहण्याची नाजूक पण तेवढी खोल दृष्टी आहे.

 

हा संग्रह वाचकाला केवळ उपदेश देत नाही. तो त्याला हळूच स्वतःच्या आतल्या पंढरीकडे घेऊन जातो. आणि मग जाणवतं— विठ्ठल शोधण्यासाठी नेहमी दूर जाण्याची गरज नसते. कधी कधी एखाद्या प्रामाणिक कवितेतही विठ्ठल भेटतो.

 

|| विठ्ठलार्पण ||

 

— जयराम धोंगडे, नांदेड

 

ता. क. : मी कविता किंवा तिचं पूर्ण कडवं येथे जाणीवपूर्वक उद्धृत केलं नाही. हा संग्रह आणि यातील प्रत्येक कविता काव्य रसिकानी हा संग्रह विकत घेऊन वाचली पाहिजे, असे मला तरी वाटते.

 

‘विभूती’ प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेला हा १०४ पृष्ठ संख्या असणारा, आकर्षक व सुंदर छपाई केलेला, केवळ ₹ २५०/- मूल्य असणारा हा संग्रह आपण नक्की वाचावा, असे मनोमन वाटते.

 

धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा