You are currently viewing राज्यस्तरीय संस्कार शिबिराचे 16 मे ला उदघाट्न

राज्यस्तरीय संस्कार शिबिराचे 16 मे ला उदघाट्न

विक्रमवीर विराग वानखडे यांची विशेष उपस्थिती…

 

अमरावती दि. 15/5/26 / (प्रति) : “मिशन आयएएस संस्कार शिबिर” या राज्यस्तरीय उपक्रमाच्या उद्घाटनासाठी सुप्रसिद्ध गायक व आठ वेळा विश्वविक्रम करणारे विक्रमवीर विराग वानखडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्या, शनिवार दि. १६ मे रोजी दुपारी ४ वाजता वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

उद्घाटनापूर्वी आज विराग वानखडे यांनी सिकची रिसॉर्ट, वलगाव येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली. रिसॉर्टचे संचालक श्री सचिन मालकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मिशन आयएएसचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव मोडक, संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, कृषी तज्ञ श्री गजानन गिलोलकर तसेच सौ. वंदना वानखडे उपस्थित होते.

अमरावतीचे सुपुत्र असलेले विराग वानखडे हे संगीत, समाजप्रबोधन आणि युवक प्रेरणा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी गायन क्षेत्रात नऊ वेळा विश्वविक्रम प्रस्थापित केले असून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकनही करण्यात आले आहे.

 

रिसॉर्टची पाहणी केल्यानंतर विराग वानखडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हे ठिकाण पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. अशा प्रेरणादायी वातावरणात मिशन आयएएसचे शिबिर आयोजित होत आहे, ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सकारात्मक बाब आहे. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा निर्णय मी घेतला असून महाराष्ट्रभरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, असा मला विश्वास आहे.”

दि. १६ ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेले हे संस्कार शिबिर प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिवेणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने वलगाव येथील रिसॉर्टमध्ये संपन्न होत आहे.

या शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व अकोल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विराग वानखडे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय तिवसा मतदार संघांचे आमदार राजेश वानखेडे, महाराष्ट्र बँकेचे विभागीय प्रबंधक महेश डांगे, वलगाव ग्रामपंचायतचे सरपंच सुधीर उगले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक व अबुधाबी वरून आलेले प्रा. डॉ. चंद्रशेखर मुरादे, पोलीस उपायुक्त श्री श्याम घुगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

=============

प्रकाशनार्थ….

प्रतिक्रिया व्यक्त करा