*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधा गर्दे लिखित अप्रतिम लेख*
*ट्रेंड*
ट्रेंडची कथा म्हणजे
“हरि अनंत हरि कथा अनंता”
आजकाल कसलं ही ट्रेंड सुरू होतं आणि ते हातोहात फुलासारखं झेललं जातं..सुरुवात करुया माणुस जन्मास येणार तेव्हापासून.
“ आई बाबा होणार” ही बातमी पसरली रे पसरली की प्रत्येक महिन्याचे फोटो फेसबुकवर अपलोड व्हायला सुरुवात. होऊ घातलेली आई आणि होऊ घातलेले
“बाबा सातवे आसमान पर”
मग डोहाळजेवण अरेरे काय हे जुनाट नाव म्हणे डोहाळजेवण नाही हो बेबी शावर असं सुबक नाव घ्या की.
मग ओटी भरून पारंपरिक पद्धतीने आणि नंतर गाऊन घालून हातात
बाबा, आई,आजी, आजोबा,मावशी, आत्या वगैरे वगैरे पाट्या घेऊन.
बाळ जन्माला आलं की लगेच फेसबुकवर फोटो,
“नव्या जगात स्वागत आहे.”
दर महिन्याला बाळाच्या वाढीचे फोटो. बारसं पंचतारांकित हॉटेलमध्ये. बाळाचे भराभर काढलेले फोटो.सगळं फेसबुकवर जाणारच.
पहिला वाढदिवस दणक्यात. फोटो हवेच बाळाला काय कळतंय त्याचा काही संबंध नाही.
मधलं सगळं झकासच .मग ठरतं मुलाच/ मुलीचं लग्न. आता वेगळा ट्रेंड. आजकाल ट्रेडीशनल पध्दतीने लग्नाचं ट्रेंड सुरू आहे.
मेंदी,हळद सगळं साग्रसंगीत. मेंदीला हिरवा ड्रेसकोड तर हळदीला पिवळा.
नवरी मुलगी नऊवारी नेसून,खोपा, सुवर्ण फूल, ट्रेडीशनल दागिने,गजरे, नथ, शेला अशा वेशभूषेत तर नवरा मुलगा पीतांबर, कुर्ता, टोपी,उपरणं या वेशभूषेत.
नवरी मुलगी डोलीतून वाजत गाजत बोहल्यावर चढणार आणि मंगळाष्टकांच्या गजरात एकमेकांना हार घालणार.
या सगळ्यांचे फेसबुकवर फोटोतर हवेच.
रील्सचा ट्रेंडने तर लोक वेडी झाली आहेत. त्या रील्सच्या कचाट्यात सापडून जीव गेला तरी बेहेत्तर पण रील्सतर करणारच. मग बायका पुरुषांच्या आवाजात बोलून वेडे वाकडे चेहरे,डोळे करत रील्स बनवतात आणि किती लाईक्स मिळाले हे बघण्यात वेळ घालवतात.
लहान लहान पोरांना नृत्याच्या कार्यक्रमात, ज्याचे अर्थ ही त्यांना कळत नाहीत अशा गाण्यांवर नको तसे नृत्य करवून त्या निरागस पोरांकडून आपलं कौतुक करवून घेण्याचा आणि अवेळीच पोरांना मोठं करण्याचा अतिशय घृणास्पद ट्रेंड सुरू झाला आहे.
मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एक ट्रेंड. अगोदर
“ अरे! अमक्या तमक्या सिनेम्यात फॉरेनची शूटिंग आहे.”
म्हणत लोक सिनेमा बघायला धावायचे.आता गावाकडील वातावरणात तयार झालेले सिनेमे दर्शकांच्या पसंतीस उतरत आहेत.
अगदी गावातील प्रसंगांना चित्रित करणारा “ लापता लेडीज”
हा सिनेम्याने थेट ऑस्कर गाठलंय.
प्राईम व्हिडिओवर पंचायत ही सीरिअल अत्यंत लोकप्रिय झाली आहे. त्यात उ.प्र.च्या बलिया घ्या एका गावाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. असे बरेच सिनेमे आणि सीरियल्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
आता गावाकडे जाण्याचा ही ट्रेंड सुरू झाला. गावाकडून शहरात धावली आणि परत गावात परतले. गावात घर घेता आले ,थोडा भाज्यांचा,फळांचा मळा करता आला तर फारच उत्तम. ज्यांना ते जमत नाही ते गावात किंवा दुसऱ्या अशा ठिकाणी फिरायला जातात जिथे हॉटेल शांत रम्य ठिकाणी असतील. रहायला लहान झोपडीवजा खोल्या असतील. चारीकडे रमणीय निसर्ग असेल. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा कल कमी झाला आहे.
उदरभरणाचा ट्रेंड ही गंमतीचा. . जेवायचं बाहेर पण घरगुती पध्दतीचं. चुलीवरील मटण भाकरी. घरगुती थालीपीठ, खरवस. धुराचा वास आजकाल फारच आवडता. कोळसा जाळून तो खाद्यपदार्थावर ठेवून झाकण ठेवायचं. ( स्मोकी फ्लेवर) ..अहाहा…. काय तो सुवास? म्हणजेच ट्रेंड.
ज्या चुलीला, त्यांच्या धुराला नाकं मुरडली तोच आज नाकावर टिच्चून ऐट दाखवतो आहे.आता जर आपण मायक्रोवेव्ह घ्यायला गेलो तर त्यात चारकोलचं एक नवीनच ऑप्शन बघायला मिळतं.
रागी, मक्का,जोंधळी,बाजरी,दलिया, किनोवा,वरी ,कोदो हे मिलिट्स म्हणजे भरड अन्न खाण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याला “श्री अन्न “ ही म्हणता.
ऑर्गेनिकचं नवीन ट्रेंड. आधी नको ती खतं घालून ढिगांनी भाज्या,अन्न पिकवलं. आता त्याने स्वस्थ बि
घडतंय म्हणून आता ऑर्गेनिक शेती करायला सुरुवात झाली.अनेक लोकतर आपल्या नोकऱ्या सोडून शेतीत लागले आणि खोऱ्याने पैसा कमवत आहेत.
हळूहळू मांसाहारी पेक्षा शाकाहारीचा जास्त चांगलं हा ट्रेंड ही सुरू झाला आहे. कारण आता पशु अकालामुळे त्यांची संख्या कमी होऊ लागली आहे जी पर्यावरणासाठी धोकादायक आहे.
स्वयंपाकघरात आजकाल पितळेच्या भांड्यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. ती भांडी कशी काय स्वच्छ ठेवत असतील हा मला प्रश्न पडतो.
प्रत्येक सण अतिशय धूमधडाक्यात साजरा करायचा ट्रेंड सुरू झालाय तो टी. वी. मालिकांमुळे. आपले जुने कुळधर्म कुळाचार करायचे याला मध्यंतरी जुनाट पद्धती म्हटलं जायचं. तेच आता इव्हेंटसारखे साजरे करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
सणाला नवीन रूप आलं आहे जणू सण आता तारुण्यात पदार्पण करत आहेत.त्यातील एक प्रकार म्हणजे गरबा. त्यासाठी जागा, मागोमाग कपडे, दागिने,मेकप सगळं झकपाक.
बाजार करायला जायचंय ही गंमत आता हळूहळू लोप पावते की काय? ही शंका यायला लागली कारण ऑनलाईन शॉपिंगचं ट्रेंड. त्यामुळे विक्रेत्यांची चंगळ. अनेकदा फसवल्याची ही उदाहरणे दिसून येतात पण तरी ऑनलाईन शॉपिंग करायचंच. वर चार लोकांसमोर ऐटीनी ‘हे ऑनलाईन घेतलं.” हे सांगून आम्हाला किती माहिती आहे ते दाखवून द्यायचं.
वेशभूषा, केशरचना यांचा ट्रेंड ही गमतीशीर आहे. स्त्री ही केस कापून, पॅन्ट शर्ट घालते आहे तर पुरुष केस वाढवून पोनीटेल घालून, कानात, गळ्यात, हातात दागिने (?) घालून आणि पैठणीचे नऊवारी सदृश परिधान घालून, वर छोट्या कोटासारखं काहीतरी घालून एक शेला घेऊन मिरवतात.
पण हो काही ठिकाणी आजकाल स्त्रियां साडीच नेसून पारंपरिक ट्रेंड चालवत आहेत. हे ही विसरायला नको.
ट्रेंड्स,ट्रेंड्स म्हणतात ते हेच असावेत.
राधा गर्दे
कोल्हापूर
