You are currently viewing निवजे-आंबेरी ग्रामस्थांचा १० वर्षांचा वनवास संपला; नव्या पुलाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
Oplus_16908288

निवजे-आंबेरी ग्रामस्थांचा १० वर्षांचा वनवास संपला; नव्या पुलाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

पावसाळ्यात तुटणारा संपर्क कायमचा सुटला; “मला कारणं नकोत, रिझल्ट हवा” म्हणत अधिकाऱ्यांना दिल्या स्पष्ट सूचना

कुडाळ :

पावसाळ्यात संपर्क तुटण्याच्या समस्येमुळे गेली १० वर्षे वनवास भोगणाऱ्या निवजे-आंबेरी ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या नव्या पुलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, “आमदार नसतानाही मला या पुलाची गरज माहिती होती. आज हे काम पूर्ण झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे.”

निवजे-आंबेरी येथील जुना पूल अत्यंत छोटा असल्याने पावसाळ्यात पाणी वाढले की गावांचा संपर्क पूर्णपणे तुटायचा. ग्रामस्थांकडून मागील १० वर्षांपासून नव्या पुलाची मागणी करण्यात येत होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीअभावी हे काम रखडले होते. आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर हा पूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.

कार्यक्रमात बोलताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत स्पष्ट शब्दांत सुनावले. “मला कोणाकडूनही कामात चालढकल नको आहे. मला कारणं सांगू नका, मला ‘रिझल्ट’ हवा आहे. गावाच्या विकासासाठी तुमची दृष्टी स्पष्ट हवी. तक्रारी करण्यापेक्षा विकासकामांसाठी कुठे काय हवे, हे मला सांगा,” असे ते म्हणाले.

तसेच, “तुम्ही मला निवडून दिले आहे, आता कामाची जबाबदारी माझी आहे. निवजे-आंबेरीवासीयांनी आपला आशीर्वाद असाच पाठीशी ठेवावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पुलाचे लोकार्पण झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा