You are currently viewing बिगर भाजप सरकारांनी NEP 2020 ला विरोध करावा – डॉ. गणेश देवी

बिगर भाजप सरकारांनी NEP 2020 ला विरोध करावा – डॉ. गणेश देवी

शिक्षक भारतीचे राष्ट्रीय शिक्षण धोरणा विरोधात निषेध संमेलन संपन्न

नवीन NEP विरोधात देशाभरातील शिक्षक संघटनांची एकजूट

कासार्डे : दत्तात्रय मारकड

केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण धोरण (NEP 2020) च्या विरोधात देशव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्धार देशातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन केला आहे. NEP 2020 हे गरीब विरोधी, खाजगीकरण वाढवणारं आणि RSS चा अजेंडा पुढे नेणारं असल्याची टीका या संघटनांनी केली आहे. बिगर भाजप सरकारांनी NEP 2020 ला जाहीर विरोध करावा, असं आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी संमेलनाचा समारोप करताना केले.

शिक्षक भारतीच्या पुढाकाराने 5 आणि 6 सप्टेंबर रोजी झालेल्या या ऑनलाइन निषेध संमेलनात देशभरातुन हजारो प्रतिनिधींनी भाग घेतला.
अमेरिकन शिक्षण पद्धतीची फक्त कॉपी :पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात

5 सप्टेंबर रोजी या परिषदेचे उद्घाटन करताना युजीसीचे माजी चेअरमन पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी ग्रामीण भागात पोचलेलं उच्च शिक्षण मोडून काढण्याचा घाट BJP सरकारने केला असल्याची टीका केली. अमेरिकन शिक्षण पद्धतीची फक्त कॉपी केली आहे. मात्र त्यातून खाजगीकरण वाढणार असून सर्वसामान्यांच्या मुलांना उच्च शिक्षण आणखी महाग होणार आहे, अशी टीका थोरात यांनी केली.

NEP 2020 म्हणजे भारताची विविधतेने फुललेली समिश्र संस्कृती मोडून काढण्याचा डाव असल्याची टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी केली. हिटलरने त्याच्या नाझी राजवटीत पहिला हल्ला विद्यापीठांवर आणि शिक्षण व्यवस्थेवर चढवला होता. गेल्या काही वर्षात मोदी सरकारने विद्यापीठांवरच हल्ला चढवला असून महात्मा फुले, टागोर, गांधी आणि आंबेडकर यांची विचारधारा संपुष्टात आणण्याचा घाट NEP 2020 च्या मार्फत सरकारने घातला आहे, असंही देवी म्हणाले. 6 सप्टेंबर रोजी परिषदेच्या समारोप सत्रात देवी बोलत होते.

1 लाख शाळा आणि 35 हजार कॉलेजेस बंद पडतील: आम.कपील पाटील

समारोप सत्रात बोलताना आमदार कपिल पाटील यांनी नवं शिक्षण धोरणामुळे देशातील 1 लाख शाळा आणि 35 हजार कॉलेजेस बंद पडतील. महाराष्ट्रात मागच्या शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या प्रयोगांना NEP 2020 ने मान्यताच दिली आहे, असा आरोप केला. पूर्व प्राथमिक आणि विद्यापीठीय शिक्षण यावर संघ विचारांचा ताबा मिळवण्याचा आणि देशाला मागे नेण्याचा हा उलटा रोडमॅप आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीचे नेते आणि शिक्षणतज्ज्ञ गिरीष सामंत यांनी NEP 2020 लोकशाही विरोधी असून हे धोरण अमलात आलं तर देशातील काही लाख शिक्षकांच्या नोकऱ्या जातील. गरीबांना शिक्षण दुरापास्त होईल, असे सांगितले.

*NEP 2020 गरीब विरोधी*:ताप्ती मुखोपाध्याय

एमफुक्टोच्या अध्यक्षा ताप्ती मुखोपाध्याय यांनी विद्यापीठीय शिक्षण सरकार मोडून काढत असल्याचा आरोप केला व NEP 2020 गरीब विरोधी असल्याचं प्रतिपादन केलं.

शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षा मित्र संघचे प्रदेश मंत्री कौशल कुमार सिंग, हरियाणा अतिथी अध्यापक संघाचे संयोजक राजेंद्र शर्मा, अखिल भारतीय अस्थायी अध्यापक महासंघ हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष सुनील चौहान, पंजाब शिक्षा प्रोव्हायडर अजमेर सिंग, उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षा मित्र संघचे पुनीत चौधरी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे नवनाथ गेंड, छात्र भारतीचे महाराष्ट्र अध्यक्ष रविंद्र मेढे या सर्वांनी 5 सप्टेंबर रोजी संमेलनाच्या पहिल्या दिवशी बोलताना NEP 2020 ला कडाडून विरोध करून एकजूट करण्याचा निर्धार केला. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी सर्व शिक्षक संघटना NEP 2020 च्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठतील असा विश्वास दिला. NEP 2020 महाराष्ट्रात राबवू नये या मागणीसाठी शिक्षक भारती महाराष्ट्र शासनाकडे मागणी करणार असल्याचं शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी संमेलनाची माहिती देताना सांगितलं. छात्र भारतीचे सागर भालेराव यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन केलं.

सिंधुदुर्गातील संजय वेतुरेकरांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणा विरोधात ठराव मांडला

6 सप्टेंबरला समारोप सत्रात बुक्टोच्या मधू परांजपे आणि शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी या राष्ट्रीय शिक्षण धोरणा विरोधातील ठराव मांडले. शिक्षक भारतीचे कार्यवाह प्रकाश शेळके यांनी सर्वांचे आभार मानले.
निषेध संमेलनात अनेक ठराव पास करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + eleven =