फोंडाघाटात मुसळधार पावसाची हजेरी; वातावरणात गारवा
फोंडाघाट :
गेल्या चार दिवसांपासून पावसाळी ढग दाटून येत असतानाही प्रत्यक्ष पावसाची प्रतीक्षा कायम होती. अखेर आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास फोंडाघाट परिसरात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल एक तास सलग कोसळलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा निर्माण झाला आहे.
उन्हामुळे तापलेल्या रस्त्यांवर पावसाचे थेंब पडताच मातीचा दरवळ सर्वत्र पसरला असून वातावरण प्रसन्न झाले आहे. पावसाच्या सरींमुळे फोंडाघाटातील डोंगर धुक्यात हरवून गेले असून काही काळ डोंगररांगा पूर्णपणे दिसेनाशा झाल्या होत्या.
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर फिरणारी जनावरेही आसरा शोधताना दिसून आली. अपेक्षित पावसामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरात अजूनही अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत.
