You are currently viewing वैभववाडीत आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; रिक्त पदांमुळे सेवा विस्कळीत
Oplus_16908288

वैभववाडीत आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; रिक्त पदांमुळे सेवा विस्कळीत

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ आढावा बैठकीत सदस्य देवानंद पालांडे यांचा संताप; उपकेंद्रांतील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

वैभववाडी :

वैभववाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच प्रत्यक्षात आरोग्य विभागाचा कारभार ढासळल्याची तीव्र नाराजी पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनी व्यक्त केली. पंचायत समिती सभागृहात सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या आढावा बैठकीत हा मुद्दा ऐरणीवर आला.

यावेळी पालांडे यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सेविका पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे सांगितले. उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर उपकेंद्रांतील आरोग्य सेविकांना ड्युटी लावली जात असल्यामुळे संबंधित भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

तसेच अनेक उपकेंद्रांमध्ये सफाई कामगार नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “अशा पद्धतीने कारभार सुरू राहिल्यास तालुक्याचे आरोग्य कसे सुधारणार?” असा सवाल उपस्थित करत पालांडे यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी निकषांची स्पष्ट यादी तयार करून ती प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, तसेच अभियानात लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत मांडल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा