*सार्वजनिक ठिकाणांच्या विद्रुपीकरणाबाबत आक्रमक होऊन मनसेने दिला होता निर्वाणीचा इशारा…जिल्ह्यातील वृत्तपत्रांनी देखील दखल घेऊन व्यक्त केली होती नाराजी..*
*झालेल्या प्रकाराबाबत चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलून आठ दिवसांत दुरुस्ती करण्याचे निर्मात्यांनी दिले आश्वासन..*
पणदुर :
झी मराठी चॅनल वरील “रात्रीस खेळ चाले” मालिकेचे निर्माते श्री सुनील भोसले यांनी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे पणदूर येथे भेट घेतली. यावेळी मनसे एस.टी. परिवहन संघटनेचे उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, कुडाळ सचिव राजेश टंगसाळी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष गुरू मर्गज, कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक, उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. “अण्णा नाईक परत येणार” या वाक्याद्वारे जिल्ह्यात स्प्रे पेंटिंगद्वारे सार्वजनिक ठिकाणांवर विद्रुपीकरण करण्यात आले होते. अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर झालेल्या प्रचार व प्रसिद्धी बाबत मनसेने आक्रमक भूमिका घेत तात्काळ दुरुस्ती न झाल्यास आमच्याशी गाठ आहे असा निर्वाणीचा इशारा देखील दिला होता. त्या अनुषंगाने मालिकेच्या निर्मात्यांनी मनसे शिष्टमंडळाची भेट घेऊन निर्माता म्हणून आपला या विद्रुपिकरणाशी थेट संबंध नाही मात्र झालेला प्रकार चुकीचा असून याबाबत चॅनल च्या प्रतिनिधींशी बोलून येत्या आठ दिवसांत चुका दुरुस्ती करू असा शब्द श्री.भोसले यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यात चित्रित होणाऱ्या मालिकेला आमचे नेहमी सहकार्यच असेल मात्र टी.आर.पी जिल्हावासीयांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्यास खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड दमही यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला.