इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमधून टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे आता बुमराहऐवजी या मॅचमध्ये उमेश यादवला संधी दिली जाऊ शकते. 4 मार्चपासून अहमदाबादमध्ये चौथ्या टेस्टला सुरूवात होणार आहे. ही मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारत पोहोचणार का नाही, हे हीच मॅच ठरवेल. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ही मॅच ड्रॉ तरी करावी लागणार आहे. सीरिजमध्ये टीम इंडिया सध्या 2-1 ने आघाडीवर आहे.
उमेश यादव फिटनेस टेस्टमध्येही पास झाला आहे. त्याने शेवटची टेस्ट ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर महिन्यात खेळली. दुखापतीमुळे तो सीरिज अर्धवट सोडून भारतात परतला होता. भारतात फास्ट बॉलरची कामगिरी बघितली तर उमेशची सरासरी आणि स्ट्राईक रेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात टेस्ट मॅचमध्ये 10 विकेट घेणारा तो फक्त तिसरा फास्ट बॉलर आहे. उमेशच्या आधी कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांनी अशी कामगिरी केली होती.
उमेश यादव घरच्या मैदानात 100 विकेट घेण्यापासून फक्त 4 पावलं लांब आहे. आतापर्यंत फक्त 4 फास्ट बॉलरनाच भारतात 100 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट मिळाल्या. कपिल देव यांनी घरच्या मैदानात सर्वाधिक 219 विकेट घेतल्या. इतर कोणत्याही फास्ट बॉलरला 200 विकेटचा आकडा पार करता आलेला नाही. जवागल श्रीनाथनी भारतात 108, झहीर खान आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी 104-104 विकेट घेतल्या. जर इशांत शर्मा चौथ्या टेस्टमध्ये मैदानात उतरला तर तो झहीरसोबत श्रीनाथलाही मागे टाकू शकतो. उमेश यादवने त्याच्या टेस्ट करियरमध्ये 48 मॅच खेळून 148 विकेट घेतल्या.