सिंधुदुर्गः
चिपी विमानतळाचे वारंवार उद्घाटन होऊनही अद्यापही त्याच्या सेवेला मुहूर्त सापडलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आज संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली. या समितीमध्ये अध्यक्ष खासदार गिरीश बापट, डीजीसीआयचे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत, खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे.
विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश.
चिपी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना या विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हे विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु या विमानतळाच्या अन्य कामांसोबतच धावपट्टीची दुरुस्तीदेखील बाकी आहे. त्यामुळे डीजीसीआयने विमानतळावरून विमान उड्डाण करायला परवानगी दिली नव्हती.
विमानसेवा कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी हालचालींना वेग
मात्र आता विमानसेवा कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला असून, आज जिल्ह्यात चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी संसदीय अंदाज समिती दाखल झाली. खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने विमानतळाची पाहणी केली. तसेच आयआरबीच्या अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. ही समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार आहे.
चिपी विमानतळ लवकरात लवकर आता सुरू होणारः राजीव प्रताप रूढी.
चिपी विमानतळाची पाहणी केल्यानंतर डीजीसीएचे संचालक राजीव प्रताप रूढी यांनी चिपी विमानतळ लवकरात लवकर आता सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच विमानसेवा सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग हा देशाची पर्यटन राजधानी होईल, अशी घोषणाही त्यांनी मीडियाशी बोलताना केली. चिपी विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी अलायन्स एअरलाइन ही कंपनी पुढे आली आहे. या कंपनीचे तिकीट काऊंटरचे काम देखील विमानतळावर पूर्ण होत आले आहे. अन्य काही कंपन्या या विमानतळावरून हवाई वाहतूक करायला इच्छुक असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
नारायण राणेंच्या कारकिर्दीत फक्त 14 टक्के काम.
चिपी विमानतळाचे काम आम्ही पूर्ण केलं. भाजप खासदार नारायण राणेंच्या कारकिर्दीत चिपी विमानतळाचे काम केवळ 14 टक्के झालं होतं. मात्र आम्ही ते काम 100 टक्के पूर्ण केले. त्यामुळे आता विमान वाहतूक सुरt करणार आहोत, अशी माहिती विनायक राऊतांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती.
विमानतळ सुरू होण्यास आणखी वेळ जाईल: उदय सामंत.
“चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारने चिपी विमानतळ सुरू करण्यास कुठलीही आडकाठी केलेली नाही. मात्र 23 जानेवारीला विमानतळ सुरू करण्याची कोणतीही परवानगी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून मी दिलेली नाही,” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. “चिपी विमानतळाची जी निमंत्रण पत्रिका सर्व ठिकाणी दाखवली जाते. ती अद्याप फायनल झालेली नाही. यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री संपूर्ण सहकार्य करत आहेत. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी ते पूर्ण सुरक्षित असलं पाहिजे. यासाठी थोडा आणखी वेळ जाईल,” अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळ पाहणी दौऱ्यानंतर दिली होती.