You are currently viewing साक्षी रामदुरकरने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत पटकावला चौथा क्रमांक

साक्षी रामदुरकरने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत पटकावला चौथा क्रमांक

डोंबिवलीतील स्पर्धेत सिंधुदुर्गची दमदार कामगिरी; मान्यवरांच्या हस्ते गौरव

डोंबिवली / (ठाणे प्रतिनिधी):

डोंबिवली, ठाणे येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या वतीने स्वर्गीय जान्हवी सुनील मोरे स्मृतिप्रित्यर्थ सोळा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३४ मुलींनी सहभाग घेतला. यामध्ये मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चौथा क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे नियोजन आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर यांनी उत्तम प्रकारे केले. ही स्पर्धा ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पार पडली. यावेळी इतर जिल्ह्यांमध्येही मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.

पारितोषिक वितरण समारंभात पुणे येथील आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू व माजी विश्वविजेते योगेश परदेशी, ठाणे येथील आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू संजय मांडे, मंडळाचे अध्यक्ष अभय काळे, कै. जान्हवी मोरे यांचे वडील सुनील मोरे, आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर, ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनचे खजिनदार प्रसाद शेंबेकर तसेच सहसचिव प्रदीप साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी साक्षी रामदुरकर हिला रोख पारितोषिक, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या साक्षीचे विशेष कौतुक करण्यात आले.

तसेच साक्षीसोबत उपस्थित मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या कॅरम खेळाच्या प्रसारासाठी तसेच शालेय मुलांमध्ये या खेळाची आवड निर्माण करण्यासाठी केलेल्या कार्याचेही मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

साक्षी रामदुरकरच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा