नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण; पर्यटन विकासाला नवी चालना, दीड कोटींच्या प्रकल्पाला वेग
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी लगत अणाव दाबाची वाडी तलाव शेजारी उभारण्यात आलेल्या उद्यानामुळे परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडणार आहे. जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (पर्यटन) या लेखाशीर्षातून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यापैकी आतापर्यंत ९८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या उद्यान विकासकामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरीच्या काठावर असलेल्या तलाव परिसराच्या सुशोभीकरणामुळे हा भाग पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. उद्यानात आकर्षक पदपथ, आधुनिक सुविधा आणि विविध प्रकारची वृक्षलागवड करण्यात येत असून पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांसाठी हा परिसर विरंगुळ्याचे आकर्षक ठिकाण बनणार आहे.
