You are currently viewing महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती; ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण

महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती; ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; लेखापरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता व गती वाढणार

७४० प्रलंबित प्रकरणांचा ऑनलाईन तपशील; १९८६ पासूनची माहिती एका क्लिकवर उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी :

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल व लेखापरीक्षण व्यवस्थेला डिजिटल बळ देणारे ‘IAW सिंधुदुर्ग’ हे आधुनिक वेब अ‍ॅप्लिकेशन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे अंतर्गत लेखा परीक्षण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकलेखा समितीच्या शिफारशीनुसार १९७७ पासून कार्यरत असलेल्या अंतर्गत लेखा परीक्षण पथकाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त १४ कार्यालयांचे महसूली जमेचे लेखापरीक्षण केले जाते. नव्या वेब अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, तहसीलदार तसेच लेखा परीक्षण पथकातील अधिकारी व सहाय्यक अशा एकूण ३६ वापरकर्त्यांना लॉगिन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रणालीमध्ये तब्बल ७४० प्रलंबित परिच्छेदांचा तपशील ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून १९८६ सालापासूनची जुनी प्रकरणेही सहजपणे पाहता येणार आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.

या अ‍ॅप्लिकेशनमध्ये संभाव्य वार्षिक दौरे, लेखापरीक्षण सूचनापत्र, तपासणी सूची, स्थायी आदेश, मसुदा (ड्राफ्ट) अहवाल, अंतिम अहवाल, ऑनलाईन अनुपालन सादर करण्याची सुविधा तसेच मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रगती अहवालांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पथक सदस्यांच्या दैनंदिनीची नोंद ठेवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या डिजिटल प्रणालीमुळे महसूल व्यवस्थापन अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि परिणामकारक होऊन प्रशासनाच्या कार्यक्षमतेत मोठी सुधारणा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा