You are currently viewing नाट्यसंहिता परीक्षणात सायली लोणे प्रथम

नाट्यसंहिता परीक्षणात सायली लोणे प्रथम

साहित्यिक कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम

सावंतवाडी :

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्या तर्फे जानेवारी महिन्यापासून ‘सुप्रसिद्ध साहित्यिक कै.कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम’ राबवला जात आहे. सहभागी चौदा वाचक दरमहा एक पुस्तक वाचून त्यावर परिक्षण लिहीत आहेत. मार्च महिन्यातील ‘नाटक’ या साहित्य प्रकारात शिरोड्यातील सायली लोणे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर वैभवी रायशिरोडकर यांना द्वितीय आणि प्रियदर्शनी म्हाडगुत व सोमा गावडे यांना तृतीय क्रमांक मिळाला. सायली लोणे यांनी वीणा गवाणकर यांच्या ‘शाश्वती ‘या नाट्यसंहितेचे परिक्षण केले होते.

या उपक्रमांतर्गत प्रियदर्शनी म्हाडगुत यानी विजय तेंडुलकर यांच्या कमला, सरोज रेडकर यानी वि.वा.शिरवाडकर यांच्या नटसम्राट, अरुण धर्णे यानी प्र. के. अत्रे यांच्या पाणिग्रहण, नीलम कांबळे यांनी गिरीश कर्नाड यांच्या तलेदंड , स्नेहा नारींगणेकर यानी पु. ल. देशपांडे यांच्या भाग्यवान, राजेश वैज यानी ज.तु.गार्डे यांच्या घर असतं दोघांचं, जयदीप देशपांडे यानी पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या कट्यार काळजात घुसली, सोमा गावडे यानी डॉ. अनिल सरमळकर यांच्या मी अश्वत्थामा, वैभवी रायशिरोडकर यानी जयवंत दळवी यांच्या नातीगोती, शेखर पणशीकर यानी संदिप मणेरीकर यांच्या सं. सूरसम्राट, अर्चना लोखंडे यानी पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी, विशाखा वेंगुर्लेकर यांनी गंगाराम गवाणकर यांच्या सं. विठ्ठल विठ्ठल आणि विनय सौदागर यानी अजित दळवी यांच्या गांधी विरुद्ध गांधी अशा चौदा नाटकांचे परिक्षण करण्यात आले.

कुडाळ येथील चोखंदळ वाचक प्रसाद रेगे यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमासाठी दाभोली हायस्कूलचे निवृत्त माध्यमिक शिक्षक लक्ष्मण साळगावकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात साळगावकर सरांनी परिक्षण करताना स्पर्धकांच्या जाणवलेल्या त्रुटी व घ्यावयाची काळजी याविषयी मुद्देसूद मार्गदर्शन केले व निकाल घोषित केला. या उपक्रमाच्या संयोजनाचे काम विनय सौदागर यांनी पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा