ओटव येथील जबरी चोरीचा गुन्हा तीन दिवसांत उघड; दोन आरोपी मुंबईतून जेरबंद
गुन्हा अन्वेषण विभागाची शिताफी; १.४५ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्यांवर कारवाई
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटव-ओटववाडी येथे वृद्ध महिलेवर जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अवघ्या तीन दिवसांत अटक करून गुन्ह्याचा छडा लावला आहे. साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (वय २१, रा. वसई रोड, ठाणे) आणि मुकेश महेंद्र पाटणे (वय २८, रा. साईनाथनगर, विरार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी सुवर्णा नारायण रावले (वय ६६, रा. ओटव-ओटववाडी) यांच्याकडील सुमारे १९ ग्रॅम ५०० मिली सोन्याचे दागिने, अंदाजे १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा ऐवज, २२ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने चोरी करण्यात आला होता. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना गुन्हा अन्वेषण विभागाने तांत्रिक विश्लेषण व मानवी माहितीच्या आधारे आरोपी मुंबई परिसरात असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार मिरा-भाईंदर येथे सापळा रचून दोन्ही आरोपींना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली. रविवारी सकाळी त्यांना कणकवली येथे आणून पुढील तपासासाठी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर टवटे, किरण देसाई, व्हिल्सन डिसोजा आदींचा सहभाग होता.
दरम्यान, सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाने खून, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी आदी गंभीर गुन्ह्यांचा सातत्याने छडा लावून प्रभावी कामगिरी बजावली आहे. राज्यासह कर्नाटक, गोवा, दिल्ली आदी ठिकाणांहून आरोपींना अटक करत टिमवर्कच्या बळावर पोलीस दलाने उल्लेखनीय यश मिळवले असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
