You are currently viewing वादळी वाऱ्याने सावंतवाडीत मोठे नुकसान; भरपाईसाठी शासन कटिबद्ध – नितेश राणे
Oplus_16908288

वादळी वाऱ्याने सावंतवाडीत मोठे नुकसान; भरपाईसाठी शासन कटिबद्ध – नितेश राणे

६१ ठिकाणी हानी; जास्तीत जास्त नुकसान भरपाईसाठी प्रशासनाला निर्देश

आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात, शक्तीपीठ महामार्ग व आरोग्य भरतीबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा

सावंतवाडी :

दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. तालुक्यात जवळपास ६१ ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती तहसीलदारांनी दिली असून, जिल्हाधिकारी व प्रशासनाशी चर्चा करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“नुकसान मोठे झाले आहे. शासनाच्या निकषांनुसार तसेच गरज पडल्यास चौकटीबाहेर जाऊनही नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न करू. सध्याच्या परिस्थितीत जनतेला आधाराची गरज आहे,” असे स्पष्ट मत मंत्री राणे यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांनी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय तसेच रामेश्वर प्लाझा परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली. संबंधित ठिकाणांचा सविस्तर आढावा घेत त्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून नागरिकांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळू शकेल.

मंत्री राणे यांनी सांगितले की, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. “सरकार म्हणून आम्ही जनतेच्या पाठीशी आहोत,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

दरम्यान, संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, काढलेल्या गाळाचे व्यवस्थापन करण्यासाठी स्पष्ट धोरण तयार करण्यात आले आहे. प्रशासनामध्ये पूर्ण समन्वय असून काही ठिकाणी गैरसमज निर्माण झाले असतील, तरी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना म्हणून धोकादायक झाडे हटविणे, नालेसफाई आदी कामे सुरू असून आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्याची तयारी करण्यात आली आहे. महावितरणच्या कामकाजात मागील वर्षाच्या तुलनेत सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, तो जिल्ह्यातील कामांसाठी वापरला जात आहे.

भूमिगत वीजवाहिन्यांसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यात येतील. तसेच, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत शासनाच्या निकषांनुसार देण्यात येईल.

याशिवाय, शक्तीपीठ महामार्गाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देताना त्यांनी सांगितले की, या मार्गाचा जिल्ह्याला जास्तीत जास्त फायदा होईल याची काळजी घेण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनांची दखल घेऊन नव्या मार्गाची आखणी करण्यात आली असून, बांदा व इतर गावे बाधित होणार नाहीत. तसेच हा मार्ग रेडी पोर्टशी जोडला जाणार असल्याने विकासाला चालना मिळेल. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

आरोग्य सेवांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची नेमणूक सुरू असून सावंतवाडीला एमडी फिजिशियन देण्यात आला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत आरोग्य विभागातील उर्वरित रिक्त पदेही भरली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणीवेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवराज लखमराजे भोंसले, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जि.प. सदस्य विक्रांत सावंत, प्राचार्य डी.एल.भारमल, सभापती दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, प्रतिक बांदेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक उदय नाईक, दिलीप भालेकर, जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संतोष गांवस, संतोष मठकर आदींसह सर्व विभागांचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा