You are currently viewing मुख्याधिकारी अभावी प्रशासकीय कामांचा बोजवारा

मुख्याधिकारी अभावी प्रशासकीय कामांचा बोजवारा

मुख्याधिकारी अभावी प्रशासकीय कामांचा बोजवारा

*सावंतवाडी पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या; सेना नगरसेवक देव्या सूर्याजी यांची मागणी*

*मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना पत्र*

सावंतवाडी :

शहरात सध्या नळपाणी योजना आणि गॅस पाईपलाईनची कामे युद्धपातळीवर सुरू असताना, पालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. यामुळे नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत असून शहरवासीयांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले विनायक औंधकर यांच्याकडे ओरोस, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन ठिकाणांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने स्थानिक प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची तक्रार आहे. परिणामी नागरिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या बदलीनंतर सावंतवाडी नगरपालिकेला एकही कायमस्वरूपी अधिकारी मिळालेला नाही. जे अधिकारी आले, त्यांचा कार्यकाळ अल्प राहिल्याने प्रशासनात सातत्य राहिलेले नाही. शहरात सुरू असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे.
नळपाणी योजना आणि गॅस पाईपलाईनसाठी सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासकीय समन्वयाअभावी समस्या अधिकच तीव्र होत असून, तक्रारी करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची नागरिकांची भावना आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तात्काळ कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. तसेच या मागणीची प्रत नगरपालिका आयुक्त आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनाही पाठविण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा