*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम कथा*
*”आणि सायली डॉक्टर झाली”*
*(एका हळव्या बापाची संवेदनशील कथा)*
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते काही खोटं नाही.मुळात सायली ही हुशार मुलगी अभ्यासातच नाही तर शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात ती पुढेच.त्यामुळे सायलीची शाळेत चर्चा व्हायची.खेळ,स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम अशा वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊन आजवर सायलीने अनेक बक्षिसे शाळेला मिळवून दिलीत.त्यामुळे शिक्षकांकडून तिचं कौतुक व्हायचं सायली म्हणजे शाळेतली आदर्श व गुणी मुलगी अशी तिने ओळख निर्माण केली.म्हणूनच की काय चांगलं शिक्षण घेऊन काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द सायलीच्या मनात होती.पण घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे सायली स्वप्नांना पंख लावत नव्हती.परंतु अभ्यास आणि शाळा मात्र काही चूकवायची नाही. वडिल कापड दुकानात कामाला होते पण सायलीची हुशारी व गुणवत्ता बघता बाबांनी सायलीच्या शिक्षणाला काहीच कमी केले नाही. त्यामुळे तिला आईवडिलांच्या कष्टाची जाणीव होती आणि त्याची परतफेड म्हणून सायली ने बारावीत पहिल्या क्रमांकाने पास होवुन केली. आईबाबांना प्रचंड आनंद झाला बाबांच्या प्रेमाची,कष्टांची आणि काळजीची कहाणी व सायलीच्या यशाचा तो क्षण केवळ तिच्यासाठीच नव्हता,तर तिच्या आई-वडिलांच्या अनेक वर्षांच्या कष्टांचा परिपाक होता.खरतर सायलीला डॉक्टर व्हायचं होतं त्यासाठी खूप पेसै लागणार होते.पण सायली बोलू शकत नव्हती.तरीही तिची सिईटी परिक्षेची तयारी सुरू केली त्यातही तिने पहिलाच नंबर मिळवला आणि….सायली ने तिच्या मनातली इच्छा बाबांना बोलून दाखवली सिइटी मेरीट मध्ये पास झाल्याने वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश फी काही लागणार नव्हती पण इतर खर्चाची तरतूद करण्याची बाबांनी तयारी दाखवली आणी मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये सायलीला प्रवेश मिळाला.डॉक्टर होण्यासाठी प्रवेश मिळवणं हे स्वप्न सायलीने पाहिलं होतं,पण ते साकार करण्यासाठी तिच्या बाबांनी आयुष्यभर झिजून काम केलं होतं.
सायलीच बालपण खूप साधं होतं.गावातलं छोटंसं घर,मर्यादित उत्पन्न,पण मनात मोठी स्वप्नं.तिचे बाबा रोज सकाळी लवकर उठून कामावर जायचे.खूप कष्ट करायचे,
डॉक्टर व्हायचं जेव्हा सायलीने बाबांना सांगितले तेव्हा तिच्या आई-वडिलांनी एक निर्णय घेतला होता की “आपली सायली आता डॉक्टर होणार” तेव्हा काहीजरी झालं तरी आपल्या सायलीला डॉक्टर करायचच त्यासाठी किती कष्ट करावे लागले तरी चालेल पण सायली डॉक्टर झाली पाहिजेच आपली एकच मुलगी आहे तेव्हा तिच्या शिक्षणात कधीच तडजोड करायची नाही.शाळेची फी भरण्यासाठी कधी बाबांनी अतिरिक्त काम केलं,तर कधी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्यात सायलीला नवीन पुस्तके घ्यायला पैसे नसायचे तर बाबा उधार उसनवारी करून नवीन पुस्तके आणून द्यायचे पण तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.सायली जसजशी मोठी होत गेली,तसतशी तिची मेहनतही वाढत गेली.बारावीच्या परीक्षेच्या काळात तर तिने दिवस-रात्र एक करून प्रथम क्रमांक मिळवला आणि मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये तिची निवड झाली.घरात आनंदाचा उत्सव होता,पण बाबांच्या मनात एक वेगळीच तगमग सुरू होती.आनंदा सोबत काळजीही होती.एक हलकीशी हुरहुरही होती
कारण आता सायली मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाणार होती… घरट्या बाहेर उडणार होती….एकटी.
आई सुमन तिच्यासाठी खाऊ,कपडे, गादी तिला लागणाऱ्या वस्तू सारं सामानाची बाधबुंध सर्व काही तयारी करून देत होती.आईच्या प्रत्येक हालचालीत काळजी आणि माया ओसंडून वाहत होती.तिथे जावून उगाच धावपळ व्हायला नको म्हणून आई पुरेपूर काळजीने जे काही लागेल ते बांधून देत होती.आणि बाबा काहीसे..नाराज दिसत होते? आईला मदत करता करता मध्येच उठून आरसा पुसायला जायचे. दिवसभरातून अनेकदा आरसा पुसून झालं होतं.बाबांच काय चाललंय कुणाला काही कळत नव्हते शेवटी सायलीने विचारलंच
“बाबा,!कितीदा आरसा पुसणार तुम्ही ? आता पुरे झालं ना?”
बाबा गंभीर झालेत.आणि थोडं हसत उत्तर दिलं,कसं आहे ना बेटा आरसा स्वच्छ असला की आपली प्रतिमा ही स्वच्छ दिसते.आरशाला जराही डाग लागला की असं वाटतं की तो डाग आपल्यालाच लागला की काय. कारण कोणीही स्वच्छ प्रतिमाच स्विकारतो,डाग लागलेलं कोणीही स्विकारत नाही.आरशाला तडा गेला की फेकून देतो पण माणसांचं काय?
अगदी तसंच….. आरशाला लागलेला डाग पुसला जातो बेटा..पण……
सायली शांतपणे ऐकत होती.त्या साध्या शब्दांमध्ये तिच्या आयुष्याचा मोठा धडा दडलेला होता.बाबांनी आरसा पुसताना खरं तर तिच्या आयुष्याचा आरसा स्वच्छ ठेवण्यासाठीचा संदेश दिला होता.मुंबईसारख्या मोठ्या शहरात शिक्षणासाठी जाताना केवळ ज्ञान मिळवणं महत्त्वाचं नसतं तर स्वच्छ चारित्र्य आणि चरित्र जपून ठेवन
अधिक महत्त्वाचं असतं.आरशावर छोटासा डाग जसा स्पष्ट दिसतो, तसंच माणसाच्या आयुष्यातील एक चुकीच पाऊल त्याच्या संपूर्ण प्रतिमेला धुसर करू शकतो.आजच्या जगात यश मिळवणं कदाचित सोपं झालं असेल.पण ते स्वच्छ चारित्र्यासह टिकवून ठेवणं फार कठीण झालंय खरंतर ते एक आव्हान आहे.माणसाची ओळख केवळ त्यांच्या यशाने नाही तर त्याच्या वागणूकीने वर्तनाने आणि स्वभावाने ठरते.सायलीने शांतपणे ऐकून घेतले आणि त्याच क्षणाला सायली धावत जावून बाबांना मागून मिठी मारली.बाबांना गहिवरून आले त्यांच्या डोक्यात नाही नाही ते विचार घोळत होते.सायली घर सोडून जाणार होती मुंबई मोठं शहर,मोठ्या संधी… पण त्यासोबत अनेक आव्हानंही.बाबांना माहित होतं, तिथे सगळेच विद्यार्थी चांगले असतील असं नाही. काही जण योग्य मार्ग दाखवतील,तर काही चुकीच्या दिशेला ओढण्याचा प्रयत्न करतील.
याचीच एक अनामिक भीती बाबांना वाटत होती.”माझी सायली तिथे एकटी असेल… तिच्याकडे लक्ष द्यायला मी किंवा तिची आई नसणार… तिच्या प्रत्येक पावलावर तीच स्वतःची जबाबदारी घेणार…” या माणसांच्या गर्दित स्वतःला सांभाळून घेणं सध्यातरी खूप कठीण झालंय.
बाबांना काय म्हणायचं होतं हे सायलीला कळत होत बाबा़ंचा प्रत्येक शब्द काळजात घर करत होतं.खर आहे ना स्वतःला सांभाळून घेणं सध्यातरी खूप कठीण झालंय पण डाग न लागु देता सुरक्षीत मार्ग काढणं ही शक्य आहे.तो कसा काढायचा ते स्वतः ठरवायचं.तरीही बाबांची काळजी रास्त होती.त्यांच्या शब्दांमध्ये एक वडिलांची खोल काळजी होती.बाबा फक्त आरसा पुसत नव्हते, तर ते सायलीला आयुष्याचा आरसा स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत होते.सायलीने बाबांचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली,
“बाबा, मला समजलं… तुम्ही मला आरसा नाही तर माझं आयुष्य स्वच्छ ठेवायला शिकवत होता,अप्रत्यक्षपणे समज देत होतात की मुंबईत गेल्यावर स्वतःला सांभाळायचं पावलांना वेगळं वळण लागायला नको आपल्या चरित्र आणि चारित्र्याला कधीही डाग लागू द्यायचा नाही.”असचं ना!
बाबांच्या डोळ्यांत पाणी आलं.
त्यांनी फक्त एवढंच म्हटलं,
“हो बेटा… तू डॉक्टर होशील, खूप मोठी होशील… पण सर्वात आधी तू एक चांगली व्यक्ती म्हणून राहिली पाहिजेस.”
कारण अंगावर स्वच्छ कपडे घातले म्हणून देह स्वच्छ झाला असं होत नाही.देह झाकला जाईल पण डाग पुसले जाणार नाही…..हे जग ही दुनीया फार मोठी आहे बेटा इथे कुणाला कुणाशी काहीही देणेघेणे नाही.वाईट संगतीने चुकीचे पाऊल टाकून नकोस चुकीच्या चौकटीत माणूस अडकला की बाहेर पडणं खूप अवघड होऊन जातं.म्हणून वाट कितीही खडतर असली तरी पावलं जपून टाकायची.कारण वाट आणि माणसं चुकीचे मिळाले की सहजासहजी स्वतःला सावरता येत नाही.बाबांच्या मिठीत मुलीची काळजी आणि एक न बोलताही दिलेला संदेश होता कारण मुलांना उपदेश करून शिकवण सोपं असतं पण कृतीतून शिकवलेल्या धडा आयुष्यभर लक्षात राहतो.बाबांनी दिलेला उपदेश ऐकून सायलीचे डोळे भरून आले.
“बाबा…. विश्वास ठेवा माझ्यावर…..
एक भरोसा देऊन जातेय मी तुम्हाला तुमची सायली कधीच चुकणार नाही. तुमचा उपदेश तुमची शिकवण कायम लक्षात ठेवेल माझ्या पावलांना वेगळं वळण लागले असं चुकीचं कृत्य करणार नाही मी” आणि त्या क्षणी सायलीच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला.ती मुंबईला गेली, नवीन आयुष्य सुरू झालं…पण प्रत्येक वेळी जेव्हा ती आरशात स्वतःकडे पाहायची,तेव्हा तिला बाबांचा तो स्वच्छ आरसा आणि त्यामागचा संदेश आठवायचा.
कारण आयुष्य हे आरशासारखंच असतं…त्यावर डाग पडायला वेळ लागत नाही,पण तो स्वच्छ ठेवण्यासाठी आयुष्यभर जागरूक राहावं लागतं तेव्हा सायलीने ठरवलं होतं की ती केवळ यशस्वी डॉक्टर नाही, तर स्वच्छ चारित्र्याची माणूस म्हणून जगेल.कारण बाबांनी कृतीतून दिलेला संदेश सायलीच्या मनात कायमचा कोरला गेला होता
कारण आयुष्य एक आरसा आहे.
तो जितका स्वच्छ ठेवणार तितके स्वतःच प्रतिबंध सुंदर दिसते. तेव्हा सायलीला बाबांच्या प्रतिकूल परिस्थितीची,त्यांच्या कष्टाची जाणीव होती.त्या अनुषंगाने बाबांनी दिलेला उपदेश काय लक्षात ठेवला आणि सायली डॉक्टर झाली.
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
