गोवा :
मडगाव येथील युनिटी क्लबने आयोजित केलेल्या चौथ्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर याने बाविसावा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे आयोजन नागोवा, मडगाव येथील स्पोर्ट्स काँम्प्लेक्स हाॅलमध्ये करण्यात आले. भारतातील विविध राज्यातील तीनशे एकवीस खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, पुष्कर केळूसकर, विघ्नेश अंबापूरकर यांच्या सोबत प्रज्वल नार्वेकर, आकाश वाटवे या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला. यावेळी रॅपिड रेटिंग स्पर्धेसोबत ब्लिट्ज नाॅनरेटिंग स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले.
रॅपिड रेटिंग स्पर्धेत बाळकृष्णने नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेसहा गुण केले आणि बाविसावा क्रमांक मिळवला. तसेच ब्लिट्ज नाॅनरेटिंग स्पर्धेत बाळकृष्णने नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेसहा गुण केले आणि एकोणिसावा क्रमांक मिळवला. बाळकृष्णला रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. रॅपिड स्पर्धेत चौदा वर्षीय पुष्कर केळूसकर याने चमकदार कामगिरी करत सहा राऊंड्स जिंकून सहा गुण केले. पुष्करने आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये तब्बल चौपन्न गुणांची वाढ केली. नऊ वर्षीय विघ्नेश अंबापूरकर याने चांगला खेळ करुन पाच राऊंड्स जिंकून पाच गुण केले. दहा वर्षीय प्रज्वल नार्वेकर याने दोन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंना हरवून चार गुण केले. विशेष म्हणजे मुक्ताई ॲकेडमीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान खेळाडू सात वर्षीय आकाश वाटवे याने पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला. आकाशने दोन खेळाडूंवर विजय मिळवून दोन गुण केले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विदयार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. सर्व स्तरातून यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
