सावंतवाडी –
येथील पालिकेचा आज 30 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक नगराध्यक्ष संजू परब यांनी सादर केले. यात रस्ते व नळपाणी योजनेला प्राधान्य देण्यात आले. 19 हजार लिटर पिण्याच्या पाणी पुरवठ्यामागे केलेल्या दरवाढीला शिवसेनेच्या नगरसेविकांनी विरोध असल्याचे सांगितले; मात्र नगराध्यक्षांनी 12 विरुद्ध 4, असा ठराव मंजूर घेवून हे अंदाजपत्रक संमत केल्याचे सांगितले.
येथील पालिकेचा 2021-2022 चे अंदाजपत्रक नगराध्यक्ष परब यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत सादर केले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, राजू बेग, मनोज नाईक, उदय नाईक, सुरेंद्र बांदेकर, नासिर शेख, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर आदी उपस्थित होते.
सभेस शिवसेना गटनेते अनारोजीन लोबो, भाजप नगरसेवक ऍड. परीमल नाईक, स्वीकृत नगरसेवक जयेंद्र परुळेकर हे अनुपस्थित होते.
सुरवातीस शिल्लक 36 कोटी 27 लाख 80 हजार 562 रुपये तर एकूण जमा 30 कोटी 47 लाख 53 हजार 100 रुपये एकूण खर्च 36 कोटी 60 लाख 10 हजार रुपये अंदाजपत्रक आहे. तरतुदींमध्ये 64 कोटी 30 लाखाचे अंदाजपत्रक आहे. यावेळी विकासाचे नियोजन करत असताना घनकचरा आणि पाणीपुरवठा यासाठी 50 टक्के खर्च प्रस्तावित करण्यात आला आला.
मुख्याधिकारी म्हणाले, “”30 कोटींचे अंदाजपत्रक मांडत असताना हा आकड्यांचा खेळ नाही तर पाणीपुरवठा योजनेसाठी 46 कोटीची योजना तयार केली आहे. यामध्ये 10 टक्के पालिकेला द्यावे लागणार आहेत. नगरोत्थानमधून या खर्चासाठी नाममात्र भाडेवाढ सुचविली आहे.”
नगरसेवक बांदेकर म्हणाले, की मुळात पाणीपुरवठ्याची टाकी भरत नाही. यावर सुधारणा करण्याऐवजी नागरिकांच्या माथी भाडेवाढ मारली जात असेल तर ते चुकीचे आहे. आपणाकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या भाडेवाढीला आमचा तीव्र विरोध आहे. यावेळी झालेल्या चर्चेत भारती मोरे, मागास कल्याण सभापती वाडकर, श्रीमती सुकी यांनीही विरोध दर्शवला.
नगराध्यक्ष परब म्हणाले, “”19 हजार लिटर पाणी पुरवठा केवळ दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दहा लिटरमध्ये केवळ दोन पैसे इतकी वाढ केली आहे. शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी ही अल्पवाढ अपरिहार्य आहे.” दरम्यान, नगरसेवक शेख यांनी बांदेकर यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
नगरसेवक नाईक म्हणाले, तुम्ही तावातावाने का बोलता? अल्पभाडेवाढीचा ठराव मांडण्यात आला असून यावर पुन्हा पुन्हा बोलू नका.” त्यामुळे बांदेकर आणि नाईक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी सौ. वाडकर म्हणाल्या, की पाण्याची समस्या असताना दरवाढ नको. ही दरवाढीची योग्य वेळ नाही.”
नगरसेवक नेवगीही चर्चेत सहभागी झाले. चर्चेअंती शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेत ठराव 4 विरुद्ध 12 मताने मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष परब म्हणाले, “”यापूर्वी भूमिगत विद्युत वाहिनीसाठी आलेले 11 कोटी आणि संत गाडगेबाबा भाजीमंडईसाठी आलेले पाच कोटी परत जाण्यामध्ये यापूर्वीचे सत्ताधारी कारणीभूत आहेत.”
असा आहे अर्थसंकल्प..
अंदाजपत्रकात महसुली जमा 15 कोटी 80 लाख 53 हजार 100 तर महसुली खर्च 15 कोटी 50 हजार इतका दाखवला आहे. भांडवली जमामध्ये 14 कोटी 67 लाख रुपये तर भांडवली खर्च 21 कोटी दहा लाख दहा हजार इतका दाखवला आहे. पालिकेला मालमत्ता करातून दोन कोटी 55 लाख रुपये, पाणी बिलातून एक कोटी 59 लाख रुपये, भाजी मार्केट मधून 32 लाख रुपये, अन्य भाडे 87 लाख रुपये, विकास शुल्क 50 लाख रुपये तर महसुली अनुदान 17 कोटी 56 लाख रुपये इतकी महसुली जमाचे स्त्रोत दाखवले आहेत. महसुली खर्चाच्या प्रमुख स्त्रोतामध्ये मालमत्ता देखभाल खर्च 3 कोटी 90 लाख रुपये, मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांसाठी 25 लाख रुपये, महिला व बाल कल्याणकारी योजनांकरिता 10 लाख रुपये, दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनांसाठी 20 लाख रुपये, आस्थापन खर्च व निवृत्ती वेतन खर्च आठ कोटी 20 लाख 93 हजार दाखवला आहे.