*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*💐माहेरची मधुवेल💐*
कौलारु छप्पराचा घेत आसरा
मधुवेल चढे वेगे आम्रवृक्षावरी
आठवणी दाटूनी येती हृदयी
पुन्हापुन्हा बोलावे मायेच्या घरी.
/1/
सुंदर हिरव्यापर्णावर झुलती त्याचे
गडद गुलाबी रंगछटाचे पुष़्पझुले
श्वेत, गर्द, फिके, मध्यम, गुलबट
कळ्याफुलांच्या संभाराने वेल झुले.
/2/
लतावृक्षाच्या पर्णसंभारातून दिसे
इवलेसे नीलाकाशरुपाचे कवडसे
बहरली मधुमालती सुगंधात न्हाई
आम्रवृक्षही नजाकतीने उभा असे़.
/3/
वसंतातले चैत्रांगण हे मनोहारी
आनंदे किलबिलणारा विहंग रव
कुहुकुहू मधुरालापे कोकिळतान
मन्मनी स्मृती, हसरा वसंतोत्सव.
/4/
💐🌳💐🌳💐🌳💐🌳💐
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कलाशिक्षिका.
