समाज कल्याण विभागामार्फत रक्तदान शिबीर,
जेष्ठ नागरीक मेळावा व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्गच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त दिनांक 08 एप्रिल ते दि.14 एप्रिल 2026 रोजीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. 13 एप्रिल 2026 रोजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे, सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली “रक्तदान शिबीर तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. उल्लेखनीय सामाजिक कार्य केलेल्या जेष्ठ नागरीकांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त संतोष चिकणे तसेच जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त विशाल नार्इक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक सहायक लोक अभिरक्षक ॲड. श्रीम. श्वेता तेंडुलकर, यांनी जेष्ठ नागरिकांच्या कायद्याबाबत मार्गदर्शन केले, तसेच समाज कल्याण, अधिकारी तुषार गवळी यांनी सायबर सिक्युरिटी या बाबत जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले, आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा जात पडताळणी विभागामार्फत Online Validity प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती रूहीता तांबे, जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष,राजस रेगे, जिल्हा सरचिटणीस सखाराम सकपाळ, माजी जिल्हा अध्यक्ष बी. के. मराठे, प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, जिल्हा रूग्णालय, सिंधुदुर्ग यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती ठोंबरे तसेच मोठया संख्येने जेष्ठ नागरिक, वैद्यकिय अधिकारी/कर्मचारी, समाज कल्याण, विभागाचे अधिकारी/कर्मचारी, समातादुत(बार्टी) कर्मचारी उपस्थित होते. समतादुत सगुण जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
