You are currently viewing देवत्व

देवत्व

*कवयित्री प्रज्ञा घोडके यांच्या ‘देवत्व’ या काव्यसंग्रलाचा सुप्रसिद्घ जेष्ठ साहित्यिका डाॅ.नयनचंद्र सरस्वते यांनी दिलेला परिचय*

 

*देवत्व*

 

*सक्षम तरीही कुटुंबवत्सल कविता…!!!*

 

काव्यसंग्रह: देवत्व

परीस पब्लिकेशन, पुणे

किंमत: २००/-

GPay: 7350555632@ybl

Contact: 9604557689

 

 

भारतीय संस्कृतीच्या परीप्रेक्ष्यातून पाहायला गेले तर स्त्रीची जडणघडण ही बरीच वेगळी झालेली दिसून येते. स्वतःचा “स्व” बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणे तिच्याकडून अपेक्षित असते. पिढ्यानपिढ्या हेच संस्कार झाल्यामुळे असेल कदाचित, पण स्त्रीमध्ये व्यक्तिकेंद्री जाणिवा कमी पाहायला मिळतात असे मला वाटते. याचा अर्थ स्त्री “स्व” चा विचार करत नाही का ? तर तसे नव्हे… पण पहिले प्राधान्य हा समष्टीच्या सुखाचा येतो हे मात्र वास्तव नाकारता येत नाही. अर्थात, त्यामुळेच कुटुंबव्यवस्था आणि विवाहव्यवस्था अनेक बदल पचवून जिवंत राहिली आहे. यासोबतच माया, प्रेम, वात्सल्य, त्याग यासारख्या मूल्यांची जीवनाच्या जमिनीत पेरणी होत जाते आणि नात्यांवे वृक्ष आभाळात भिडत जातात.

 

कवयित्री प्रज्ञा घोडके यांचा “देवत्व” हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. कुटुंबाप्रति समर्पित अशा स्त्रीच्या जगण्याचे विविध पैलू त्या यात व्यक्त करतात. कुटुंबातील नातीगोती जपत असताना एक कृतार्थ जाणीव मनाला व्यापून उरते तर माता-पिता, इतर वडीलधारी मंडळी यांच्याकडून जे संस्कार, संचित लाभले आहे त्याप्रति जी कृतज्ञ जाणीव असते ती त्यांच्या कवितेत प्रकर्षाने अधोरेखित होते. एका अर्थाने दोन पिढ्यांमध्ये असलेला दुवा आणि संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करण्याची जी प्रवाही मानसिकता असते तो त्यांचा आणि त्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे.

 

याशिवाय कुटुंबात असलेल्या प्रथा-परंपरा, सणवार याविषयी लिहीत असताना त्यांची चिंतनशील वृत्ती दिसून येते. फक्त अध्यात्मिक दृष्टीकोन नव्हे तर यामागे असलेला सामाजिक आणि मानसिक पैलू विचारात घेऊन त्याचा व्यापक पातळीवर लेखाजोखा त्या मांडताना दिसतात हेच त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे असे मला वाटते. अधिक महिन्याचे महत्व लिहिताना त्या सहज लिहून जातात,

*गीतापाठ नामजप*

*पुण्यग्रंथ ते वाचावे*

*चित्तशुद्धी एकाग्रता*

*तन सुदृढ ते व्हावे*

अशा तऱ्हेने एक त्यागमय तरीही समृद्ध आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असल्याने नकारात्मक भावनांना त्यांच्या ठायी फारशी जागा नाही. अभावाचे दुःख करण्यापेक्षा जे आहे त्याचे समाधान त्यांच्या चित्तात अधिक वसलेलं आहे याची त्यांच्या लिखाणातून प्रचिती येते.

*प्रत्येकाच्या मनामध्ये*

*एक गाव वसलेला*

*सुख शांती समाधान*

*सज्ज असे स्वागताला*

यासारख्या ओळी याची साक्ष देतात. अर्थात, दुःख, निराशा, वेदना, हतबलता, अपेक्षाभंग यासारख्या भावनांना त्यांच्या कवितेत स्थान नाही का ? तर नक्कीच आहे. मानवी जीवन अनेक चढ-उतारांनी भरलेले असते. सुख-दुःखाचा लपंडाव सातत्याने चालत असतोच. अशा वेळेस माणसाला विकल करणाऱ्या अशा भावना मनात नक्कीच येऊन जातात. पण कवयित्रीचे वैशिष्ट्य आहे की, अशा भावनांना फारसा थारा न देता ; दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावाद आणि संयम याच्या बळावर त्या अशा भावनांवर मात करतात. हे करत असताना अशा भावनांचा सहज स्वीकार आणि त्या नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेला श्रद्धेचा एक अभंग पाया त्यांनी विकसित केलेला दिसून येतो. अनेक कवितांमधून त्याचे आपल्याला दर्शन होते.

*तुझा आनंद तुझ्या हातात*

*नको अपेक्षांचे ओझे काही*

*थकल्या मनाला तूच जपायचे*

*दुसरे कुणी येणार नाही*

ही जाणीव त्यांचे प्रगल्भ मन आपल्याला दाखवून जाते. समर्पित असली तरीही आत्मभान असलेली आणि समर्थ कण्याने जगण्याच्या कोलाहलात वावरणारी एक स्त्री आपल्यासमोर उभी राहते. म्हणूनच सक्षम तरीही कुटुंबवत्सल अशी त्यांची कविता आहे. वेगवेगळ्या काव्यप्रकारात व्यक्त होणारी ही कविता सहज आणि प्रवाही आहे. सालंकार असली तरीही सात्विकतेचे तेज घेऊन सामोरी येणारी आहे. त्याअर्थाने “देवत्व” हे काव्यसंग्रहाचे शीर्षक अत्यंत समर्पक आहे असे मला वाटते. विकारवासना आणि षड्रिपू यांनी वेढलेला माणूस जेव्हा आपल्या चिंतन-मननाने आपल्यामधील दोष कमी करत नेण्याचा प्रयत्न करतो आणि चांगले गुण वाढवत नेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो देवत्व या संकल्पनेच्या अधिकाधिक जवळ जात असतो. कवयित्री प्रज्ञा घोडके आणि त्यांची कविता या मार्गावर अग्रेसर आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यांच्या या प्रवासास मनापासून शुभेच्छा देते. वाचक या संग्रहाचे महत्व नक्की जाणतील हा ठाम विश्वास आहे. पुन्हा एकदा अभिनंदन करून थांबते.

 

डॉ. नयनचंद्र सरस्वते,

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा