You are currently viewing कुडाळमध्ये महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन मेळावा; सहकार उभारणीचा आमदार निलेश राणे यांचा निर्धार

कुडाळमध्ये महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन मेळावा; सहकार उभारणीचा आमदार निलेश राणे यांचा निर्धार

शिवसेनेच्या पुढाकारातून आयोजन; उत्पादनांना बाजारपेठ व आर्थिक सक्षमतेसाठी ठोस आश्वासन

कुडाळ :

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या महिला बचत गटांसाठी रविवारी येथील महालक्ष्मी हॉल येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या बाजारमालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करताना भविष्यात बचत गटांच्या माध्यमातून एक सहकार उभा करण्याचा मानस आमदार निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

या मेळाव्याचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महिला बचत गटांसाठी कुडाळ शहर प्रमुख, नगरसेवक अभि गावडे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला असून त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ते घेत असलेले उपक्रम समाजोपयोगी असून त्यातून समाजाला निश्चितच फायदा होतो आणि त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसतो.

आज महिला बचत गट विविध प्रकारचे प्रॉडक्ट तयार करत आहेत. यासाठी उदाहरण देताना त्यांनी आयटीसी कंपनीचा उल्लेख करत सांगितले की, ही जागतिक दर्जाची कंपनी असून विविध प्रॉडक्ट तयार करते, मात्र त्यांचे ब्रँडिंग एकच आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून बचत गटांसाठी पॅकेजिंग आणि मार्केटिंगची योग्य व्यवस्था केली तर त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळू शकते. व्यवसाय उभा करताना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बँकेशी निश्चितच चर्चा करू. महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील.

भविष्यात बचत गटांच्या माध्यमातून एक सहकार उभा करू, असे सांगत त्यांनी आज दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवणार असल्याचे स्पष्ट केले. “हे केवळ बोलण्यासाठी नाही, तर येत्या महिनाभरात तुम्हाला त्याची अंमलबजावणी दिसेल,” असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले की, कुडाळ शहरात आयोजित या मेळाव्यातून मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार कार्यरत महिला बचत गटांपैकी किमान दहा गटांनी सुरुवातीला अपडेट होऊन मार्केटिंगसाठी प्रयत्न केल्यास यश दूर नाही. यासाठी किमान दहा बचत गट मॉडेल म्हणून पुढे आणले जातील.

या महिला बचत गटांना उमेदचे गणेश राठोड यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हा महिला प्रमुख दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, सभापती मिलिंद नाईक, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुका प्रमुख दीपक नारकर, कुडाळ शहर प्रमुख अभि गावडे, जिल्हा परिषद सदस्य रूपेश कानडे, गटनेता विलास कुडाळकर, देवेंद्र नाईक, निखिल कांदळगावकर, नगरसेवक ॲड. राजीव कुडाळकर, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, चेतन पडते, आबा धडाम, रेवती राणे, राकेश कांदे, मंगेश चव्हाण, वैशाली पावसकर, संजय भोगटे, रेखा काणेकर तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडाळ शहर प्रमुख अभि गावडे यांनी केले. सूत्रसंचालन नागेश नेमळकर यांनी केले. आभार नगरसेविका चांदणी कांबळी यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा