अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन पणजीत दिमाखात
राजा माने यांच्या संकल्पनेतून आयोजन; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती अपेक्षित
सावंतवाडी :
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन आगामी ४ मे रोजी गोवा येथील पणजी शहरातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कला अकादमी येथे दिमाखात पार पडणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या संकल्पनेतून आयोजित या अधिवेशनाकडे देशभरातील डिजिटल व प्रिंट माध्यमातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे.
या अधिवेशनासाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच गोवा राज्यातील विविध खात्यांचे मंत्री आणि काही केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना या विषयांवर या अधिवेशनात सखोल विचारमंथन होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील हजारो पत्रकार या अधिवेशनात सहभागी होणार असल्याचे राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सिताराम गावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक सागर चव्हाण, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक, जिल्हा संघटक आनंद धोंड, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते.
पुढे बोलताना सिताराम गावडे यांनी सांगितले की, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी अनेक संघटना कार्यरत असल्या तरी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना वेगळ्या स्तरावर काम करत असून त्याचा अनुभव मागील काही वर्षांत आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, यावेळी सावंतवाडी तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये युवा व अभ्यासू डिजिटल पत्रकार सिद्धेश सावंत यांची सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी सिद्धेश पुरलकर, उपाध्यक्षपदी विशाल पित्रे, संघटकपदी प्रशांत मोरजकर, खजिनदारपदी भिकाजी उर्फ नाना धोंड, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून साबाजी परब यांची निवड करण्यात आली.
तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी त्रिविक्रम सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून सदस्य म्हणून शुभम सावंत, श्रीरंग सावंत, संदीप राऊळ, आशिष धोंड, धनराज सगम यांच्यासह इतर डिजिटल पत्रकारांची निवड करण्यात आली.
या सभेचे प्रास्ताविक सागर चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद धोंड यांनी केले.
