You are currently viewing समाजाशी समन्वय साधणारा खरा साहित्यिक! – प्रा. तुकाराम पाटील

समाजाशी समन्वय साधणारा खरा साहित्यिक! – प्रा. तुकाराम पाटील

*समाजाशी समन्वय साधणारा खरा साहित्यिक! – प्रा. तुकाराम पाटील*

*शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी’ उपक्रम*

पिंपरी

‘समाजाशी समन्वय साधणारा खरा साहित्यिक असतो!’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी विवेक वसाहत, केशवनगर, चिंचवड येथे शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांचा विशेष सन्मान करताना प्रा. तुकाराम पाटील बोलत होते.

महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून आणि जगद्गुरू तुकाराममहाराज यांच्या
‘आवडे हे रूप |
गोजिरे सगुण |
पाहता लोचन |
सुखावले ||’
या अभंगाचे तानाजी एकोंडे यांनी केलेल्या गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अशोकमहाराज गोरे यांनी प्रास्ताविकातून शब्दधन काव्यमंच या संस्थेच्या विविध साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. सन्मानचिन्ह, ‘कृष्ण’ हा बृहद ग्रंथ, शाल, श्रीफळ प्रदान करून अमित मुरडे, सुखदा मुरडे, सावी मुरडे या कुटुंबीयांच्या प्रमुख उपस्थितीत नंदकुमार मुरडे यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांनी, ‘आध्यात्मिक प्रवृत्तीचे अन् सामाजिक बांधिलकी जोपासणारे नंदकुमार मुरडे म्हणजे जणू काही ज्ञानेश्वरमाउली यांनी पिंपरी – चिंचवड साहित्यविश्वाला दिलेला प्रसादरूपी आशीर्वाद आहे!’ असे गौरवोद्गार काढले; तर शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, राजेंद्र घावटे, सुभाष चटणे, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, हेमंत जोशी, नीलेश शेंबेकर, सीमा गांधी, ॲड. अंतरा देशपांडे, शहाजी कांबळे, पंजाबराव मोंढे, फुलवती जगताप, कल्पना बंब यांनी मनोगतातून नंदकुमार मुरडे यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना उजाळा दिला. आपल्या कृतज्ञतापर मनोगतातून नंदकुमार मुरडे यांनी, ‘आशावाद अन् प्रयत्नवाद यांतून जीवनाचे सार्थक करीत समाजासाठी सकारात्मक योगदान देता येते!’ अशी भावना व्यक्त केली. आय. के. शेख, पांडुरंग सुतार, दत्ता कांगळे, राजू जाधव, संगीता सलवाजी, प्रभाकर वाघोले, सुरेश जोशी, सुहास घुमरे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा