*पत्रकारांच्या हक्क, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी नवी संघटनात्मक ताकद झाली सज्ज*
सिंधुदुर्ग :
पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, चांदा ते बांदा हे वर्तुळ आता पूर्ण झाले आहे.संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा निर्धार नव्या टीमने व्यक्त केला आहे.
अवघ्या पाच वर्षांत जगातील तब्बल ९८ देशांमध्ये विस्तारलेल्या या संघटनेने आता सिंधुदुर्गमध्ये अधिक मजबूत पाय रोवले आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) प्रदेश कार्याध्यक्ष तसेच कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. पत्रकारितेच्या बदलत्या आव्हानांमध्ये पत्रकारांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून ही नवी टीम कार्य करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नव्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी शैलेश मयेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या विस्तीर्ण भौगोलिक रचनेचा विचार करून संघटनेने जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांत प्रभावी संघटनात्मक विभागणी केली आहे. उत्तर सिंधुदुर्ग अध्यक्षपदी विष्णू धावडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अखत्यारित वैभववाडी, देवगड, कणकवली आणि मालवण हे तालुके असतील. तर दक्षिण सिंधुदुर्ग अध्यक्ष म्हणून भूषण सावंत यांच्यावर कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या भागाची धुरा सोपवण्यात आली आहे.
संघटनेच्या बळकटीकरणासाठी मिलिंद धुरी, भूषण देसाई आणि संजय पिळणकर यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच सुयोग पंडित, राजा दळवी, तुळशीदास कुडतरकर आणि जय भोसले हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. अमित पालव यांच्याकडे सरचिटणीसपद, तर संजय भाईप यांच्याकडे सह सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आर्थिक नियोजन आणि संघटनात्मक स्थैर्यासाठी आनंद कांडरकर यांची खजिनदार म्हणून नियुक्ती झाली आहे. संघटनेच्या विस्तारासाठी वासुदेव (नयनेश) गावडे, शंकर जाधव, चिन्मय घोगळे आणि विवेक परब यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे. विजय सावंत, नागेश दुखंडे आणि मकरंद मेस्त्री हे कार्यवाह म्हणून काम पाहणार असून दिपक पटेकर यांच्याकडे जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे.
याशिवाय सदस्य म्हणून गणेश कोळेकर, रणजीत जाधव आणि समीर चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला विंगमध्ये सहयोगी सदस्य म्हणून रुपाली खपाले, प्रिया मिश्रा,रेवती वालावलकर, सानिका वायंगणकर आणि जान्हवी सावंत यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संघटनेत महिला पत्रकार आणि सहयोगी सदस्यांचाही सक्रिय सहभाग वाढणार असल्याचे चित्र आहे.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही केवळ पदांची संघटना नसून पत्रकारांचे जागतिक कुटुंब आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पत्रकारितेच्या क्षेत्रातील आर्थिक असुरक्षितता, सामाजिक दबाव, मानसिक ताण आणि व्यावसायिक संरक्षण या प्रमुख मुद्द्यांवर संघटना ‘पंचसूत्री’च्या माध्यमातून काम करत आहे. पत्रकार बांधवांना न्याय, संरक्षण, प्रशिक्षण, नेटवर्किंग आणि सन्मान मिळवून देणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, मान-सन्मानाच्या पलीकडे जाऊन पत्रकार बांधवांच्या चौफेर विकासासाठी काम करा,राज्यात चांदा ते बांदा असा विस्तार असलेल्या या संघटनेच्या प्रत्येक पत्रकारापर्यंत संघटनेचा आधार पोहोचवा, असे आवाहन करण्यात आले. या नव्या कार्यकारिणी मुळे सिंधुदुर्गातील पत्रकारांना एक मजबूत व्यासपीठ मिळाले आहे. जिल्ह्यात पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावी आवाज निर्माण झाला आहे. सध्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) च्या पदाधिकारी पत्रकारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी दत्तक घेणे, मोफत प्रवेश देणे सुरु आहे. जुन्या सर्व पदाधिकारी यांना विभाग आणि राज्य टीममध्ये घेतले जाणार आहे असे कडलग यांनी सांगितले.
