You are currently viewing आता ,ऑफलाइन पद्धतीनेही करता येणार  वीजदर सवलतीसाठी नोंदणी; वस्त्रोद्योगमंत्री

आता ,ऑफलाइन पद्धतीनेही करता येणार वीजदर सवलतीसाठी नोंदणी; वस्त्रोद्योगमंत्री

मुंबई:

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणानुसार वस्त्रोद्योग प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या वीज दर सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट २७ अश्वशक्तीपेक्षा (हॉर्सपॉवर) कमी जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांसाठी शिथिल करण्यात आली असून आता अशा यंत्रमागधारकांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही नोंदणी करण्याचा पर्याय देण्यात आला असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी साध्या यंत्रमागधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत ही मागणी केली होती. भिवंडीचे आमदार रईस शेख, माजी आमदार रशीद ताहीर मोमेन, माजी आमदार आसीफ शेख रशीद, तारीख फारुकी यांनी देखील ही प्रक्रिया ऑफलाईन करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.

वस्त्रोद्योग धोरणानुसार वीजदरातील सवलतीसाठी वस्त्रोद्योग प्रकल्पांना वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक होते. मात्र, 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येत असल्यामुळे ऑफलाईन स्थळप्रतीत नोंदणीसाठी अर्ज करण्याची मागणी यंत्रमागधारकांनी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेची अट शिथिल केली असून 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमागधारकांना वीजदर सवलतीसाठी ऑनलाईनबरोबरच स्थळप्रतीत (ऑफलाईन) वस्त्रोद्योग आयुक्तांकडे ऑफलाईन अर्ज करता येईल. यासंबंधीचा शासन निर्णयही काढण्यात आला असल्याचे शेख यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा